सांगलीत अजूनही मटक्याचे पीक जोमात ; मटका ‘ओपन’, कारवाई ‘क्‍लोज’

शैलश पेटकर 
Thursday, 28 January 2021

मटका बुकी आणि मुख्य  मालक सोडून गल्लीबोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फार्स पोलिस सातत्याने करीत आहेत.

सांगली : मामा, भाऊ, भाई...या साऱ्यांच्या पश्‍चात जिल्ह्यात मटक्‍याचे जाळे आणखी घट्ट झाले आहे. मटका संपला असा कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटक्‍याचे पीक जोमात आहे. त्याचे ‘स्टिंग ऑपरेशन ‘सकाळ’ने केले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी विशेषतः वर्दळीच्या ठिकाणी मटका घेतला जातो, हे त्यातून समोर आले आहे. त्याच्या जोडीला ऑनलाईन लॉटरी, स्नूकर, क्रिकेट बेटिंग, तीन पानी जुगार, कॅरम क्‍लबच्या नावाखाली अनेक प्रकारचा जुगार जिल्हाभर रुजला आहे.

मटका बुकी आणि मुख्य  मालक सोडून गल्लीबोळातील पंटरांना अटक करून कारवाईचा फार्स पोलिस सातत्याने करीत आहेत. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यातील ३८५ अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. तीनशेवर एजंटाना अटक व सुटका झाली. मात्र, एक मुख्य बुकी त्यात नाही, सगळे पंटरच. पुढची साखळी शोधलीच जात नाही.

हेही वाचा - आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले 

पोलिस अवैध व्यवसायांना चाप लावल्याचा दावा करतात. मटका, क्राईम रेटचे समीकरण मांडले जाते. मटका सुरू झाला तर क्राईम रेट घटतो, असे पोलिस खासगीत सांगतात. प्रत्यक्षात खून, खुनी हल्ला, जबरी चोरी, दरोडा अशा मालिका सुरूच आहेत. २५ दिवसांत खुनाचे चार प्रकार घडलेत. त्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे धागेदोरे आहेत. मटक्‍याचे अड्डे बिनबोभाट सुरू आहेत. कारवाई झालीच तर दोन दिवसांनी ‘दर’ वाढवून पुन्हा कार्यक्रम सुरू होतो. शहरातील गल्लीबोळात मटक्‍याची खोकी आहेत.

ऑनलाईन पद्धतीने मटका घेण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. व्हॉटस्‌ ॲपच्या माध्यमातूनही मटका घेतला जातो. विश्रामबागसह सांगलीतील गल्लीबोळात एजंटांनी पाय पसरले आहेत. संजयनगर, माधवनगरसह औद्योगिक वसाहतीत चिठ्ठीवरचा मटका सुरूच आहे. तत्कालीन अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी १४० मटकेवाले, एजंटांवर तडीपारीची कारवाई केली होती. त्यांचे छायाचित्रासह फलकही शहरभर झळकवले. त्यामुळे मटकेवाल्यांचे धाबे दणाणले होते. 

नूतन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पहिल्याच दिवशी मटका, जुगारासह अवैध धंद्यांवर चाप लावू, असा इशारा दिला होता. पहिल्या दिवसांपासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला होता. दररोज पंधरा मटकेवाल्यांवर कारवाई झाली. त्यानंतर कारवाईचे आदेश पोलिस ठाण्यांना दिले. मात्र, सर्वत्र ‘मटका बंद’ असल्याचे सांगून कारवाई टाळली गेली. प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसत आहे. 

हा घ्या पुरावा...

‘सकाळ’ने याआधीही पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांच्या काळात ‘स्टिंग ऑपरेशन’ करून मटका अड्डे उघड केले. यावेळीही बातमीसोबत मटक्‍याची एक चिठ्ठी प्रसिद्ध करीत आहोत. ही चिठ्ठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर  क्रीडांगण परिसरातील अड्डयावरची आहे. ‘मटका बंद आहे’, असा दावा करणाऱ्यांसाठी हा एक पुरावा पुरेसा आहे.

हेही वाचा -  अनुदान बंद झाल्याने बालवाड्यांतील शिक्षिकांसमोर दिवस ढकलायचे कसे? असा प्रश्न आहे

"पोलिस अधीक्षकांनी अवैध व्यवसाय मोडीत काढण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सतत कारवाई सुरू आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून कारवाई होत आहे. काही दिवसांत अनेक ठिकाणी कारवाई झाली. यापुढेही ती सातत्याने होईल."

- अजित टिके, पोलिस उपाधीक्षक, सांगली

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime cases in sangli wager play raid by police in sangli