esakal | आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना सांगलीत अटक

बोलून बातमी शोधा

null

आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना सांगलीत अटक

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : येथील कर्मवीर चौकातील मंगलधाम शॉपिंग सेंटरच्या बोळातील खुल्या जागेत आयपीएल सट्टा घेणाऱ्या दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकून अटक केली. हे दोघे राजस्थान रॉयल्स व कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यांवर सट्टा घेत होते. त्यांच्याकडून पाच हजार रोख, मोबाईल, दुचाकी असा पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमित संजय आहीवळे (वय 23, विठ्ठल कॉलनी, शामरावनगर, सांगली), अवधुत राजेंद्र चौधरी (वय 23, रा. मारूती सुझुकी शोरूमच्या पाठीमागे, माधवनगर रस्ता, सांगली) असे अटक केलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, उपाधीक्षक अजित टिके यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक काल विश्रामबाग परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कर्मवीर चौकातील मंगलधाम शॉपिंग सेंटर येथील एका चहाच्या दुकानासमोरील बोळात दोघेजण दुचाकीवर बसून राजस्थान रॉयल्स व कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तत्काळ त्याठिकाणी छापा टाकला. दोघेजण क्रिकेटचा सामना पाहत सट्टा घेतल्याचे समोर आले. मोबाईलवर बोलत चिठ्ठीवर लिहून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून पाच हजार रोकड, एक मोबाईल, आलीशान दुचाकी असा 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर मुंबई जुगार अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलिस हवालदार आदिनाथ माने, विलास मुंढे, संदीप घस्ते, ऋतुराज होळकर, एम. एन. मुलाणी यांचा कारवाईत सहभाग होता.