Crime News : महाविद्यालयीन युवकाचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news sangli murder of college youth Three suspects police action sangli

Crime News : महाविद्यालयीन युवकाचा निर्घृण खून

सांगली : कर्नाळ रस्ता परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. अजित बाबूराव अंगडगिरी (वय १९) असे त्या युवकाचे नाव आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पूर्वीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील तीन संशयित आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

अजित अंगडगिरी हा कर्नाळ रस्त्यावरील एका बागेजवळ राहतो. तो शहरातील एका महाविद्यालयात विद्या शाखेत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतो. तसेच, त्याला छायाचित्रणाचाही छंद होता. त्याच्या वडिलांची घराजवळच पानपट्टी आहे. पद्माळे फाटा परिसरातून माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याने शेत करण्यास घेतले होते.

अजित आणि कुटुंबीय आज शेतात औषध फवारण्याचे काम करीत होते. दुपारी चारच्या सुमारास तीन तरुण दुचाकीवरून तेथे आले. पानपट्टीत अजितविषयी माहिती घेतली. तो शेतात असल्याची माहिती मिळाल्यावर तिघांनी अजितला बोलावून घेतले आणि त्यापैकी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने छातीवर एकच वार केला. त्यात अजित रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर तिघेही पळून गेले. दरम्यान, अजितचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याला येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती.

दरम्यान, शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ तपासाची सूत्रे फिरवली. पूर्वीच्या भांडणातून हा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. ते तिघे संशयित पोलिसांच्या रडारवर असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कसून तपास सुरू होता.

हद्द कोणाची?

कर्नाळ रस्त्यावर शेतात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर शहर आणि ग्रामीण पोलिस यांच्यात हद्द कोणाची, यावरून चर्चा झाली. अखेर शहर पोलिसांनी हद्द आपल्याकडे असल्याचे सांगत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.