
सन्या ऊर्फ शुभम पारसमल जैन (वय 24) खारेमळा (कुपवाड) या सराईत गुन्हेगाराचा सख्या भावाने निर्घृण खून केला.
कुपवाड (जि. सांगली) : सन्या ऊर्फ शुभम पारसमल जैन (वय 24) खारेमळा (कुपवाड) या सराईत गुन्हेगाराचा सख्या भावाने निर्घृण खून केला. या प्रकरणी सन्याचा लहान भाऊ शशांक पारसमल जैन (वय 22) या संशयितांस कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. कुपवाडच्या राणप्रताप चौकात सायंकाळी आठच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सन्या जैन हा सराईत गुन्हेगार आहे. कुपवाड जैन गल्ली परिसरात दहशत माजवल्या बद्दल त्याला पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटून आला होता. शनिवारी सायंकाळी आठच्या सुमारास लहान भाऊ शशांक याच्यासोबत घरगुती कारणावरून त्याचा वाद झाला. दारूच्या नशेच्या भरात असणाऱ्या सन्याने स्वतःच्या भावाला मारहाण करण्यास सुरवात केली.
सोबत असणारे धारधार शस्त्र घेऊन त्याने भावाचा पाठलाग केला. जवळच्याच राणप्रताप चौकामध्ये दोघांची झटापट झाली. झालेल्या झटापटीत सन्या हा ठेच लागून रस्त्यावर पडला. मारहाणीचा राग मनात धरून शशांकने त्याच क्षणी रस्त्यावरील दगड उचलून त्याने सन्याच्या डोक्यात घातला. दगडाच्या झालेल्या वर्मी वराने सन्या हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. भरपूर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या गंभीर घटनेमुळे भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक वीरकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सपोनि निरज उबाळे, पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
रोज वादावादी
सराईत गुन्हेगार सन्या जैन हा काही दिवसांपूर्वी घरफोडी प्रकरण आणि दहशतीच्या गुन्हातून जामिनावर सुटला होता. ना-त्या कारणावरून नशेच्या भरात तो दररोज घरातील व्यक्तींशी वाद घालत असे. शनिवारी रात्री त्याने पुन्हा घरात पुन्हा वाद सुरू केला. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नसल्याने झालेल्या वादात सख्या भावाने त्याचा डोक्यात दगड घालून त्याला ठार केले. कुपवाड पोलिसांत सन्यावर घरफोडी, मारामारी, चोरी, दहशत माजविणे अशा गंभीर स्वरूपाचे दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
संपादन : युवराज यादव