
त्रिवेणीश्वर मंदिरासमोर भरलेल्या यात्रेत परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. औरंगाबाद, नगर व नाशिक येथील भाविकांनी साबुदाणा खिचडीचे वाटप केले.
सोनई : महाशिवरात्रीनिमित्त नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर मंदिरात दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर फराळाचे अन्नदान सुरू होते.
त्रिवेणीश्वरला आज पहाटे पंचामृत अभिषेक, महापूजा व आरती सोहळा झाला. सकाळी दर्शनासाठी सुरू झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. दर्शनरांगेत हर हर महादेव...चा जयघोष सुरू होता. सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान कान्होपात्रा महाराजांचे कीर्तन झाले.
त्रिवेणीश्वर मंदिरासमोर भरलेल्या यात्रेत परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. औरंगाबाद, नगर व नाशिक येथील भाविकांनी साबुदाणा खिचडीचे वाटप केले. सायंकाळी महंत मुक्तानंदगिरी महाराज वेल्हाळे यांची शिवचरित्र कथा झाली. पुरोहित राजूदेवा जोशी यांच्या मंत्रघोषात पूजा झाली.
त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता, दर्शनव्यवस्था, पिण्याचे पाणी व प्रसादवाटपाची सेवा दिली.
सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली. उद्या (शनिवारी) सकाळी दहाला महंत मुक्तानंदगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.