दलबदलूंच्या विरोधात राष्ट्रवादी ताकदीने लढणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

लाेकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार की श्रीनिवास पाटील याची उत्सुकता.

सातारा : विधानसभेसोबत लोकसभेचीही पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता आम्ही शरद पवारांना फसविलेल्यांचा बदला घेणार, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांतून उमटू लागल्या आहेत. आता उदयनराजेंच्याविरोधात राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, की श्रीनिवास पाटील उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. 

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागल्याने शरद पवारांच्या जाहीर सभेनंतर चार्ज झालेल्या कार्यकर्त्यांना आता उमेदवारीबाबत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता आहे. सध्या माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव अंतिम मानले जात असले, तरी ऐन वेळी सातारकरांच्या प्रेमापोटी खासदार शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे; पण त्यासोबत श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचेही नाव इच्छुकांत आहे.

सध्या राष्ट्रवादीकडे सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर असे तीन आमदार आहेत, तर दोन्ही कॉंग्रेसची आघाडी असल्याने जिल्ह्यातील पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेली कॉंग्रेसची ताकद ही राष्ट्रवादीला मिळणार आहे, तर माजी आमदार गोरेंना मानणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद कोणासोबत जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा वेळी राष्ट्रवादीला येईल त्यांना सोबत घेऊन विधानसभेसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक लढायची आहे.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारे सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि वाईतही कार्यकर्ते आहेत. हे मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले तरी ते लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. सध्यातरी जावळी आणि साताऱ्यातील कार्यकर्त्यांना दोन्ही राजांनी कोणतीही सूचना केलेली नाही, तसेच राष्ट्रवादीकडूनही या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न झालेला नाही. 

उदयनराजेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे. ही नाराजी राष्ट्रवादीकडून कॅश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. उदयनराजेही जनतेला भावनिक साद घालू शकतात. उदयनराजेंविरोधात खासदार शरद पवार स्वत: किंवा श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी असणार आहे. स्वत: पवार उभे राहिल्यास राष्ट्रवादीला सातारा लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होईल, तर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्‍याने निवडून देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curious about Pawar or Patil for the by-elections