नोटाबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर

विकास जाधव  -  @vikasjsakaal
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

जिल्हा बॅंकेच्या कोंडीमुळे अडकली पहिली उचल

काशीळ - ऊस गाळपाचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्याने, आता बहुतांश सर्वच कारखान्यांकडून उसाची पहिली उचल बॅंक खात्यात जमा करण्याचे सत्र सुरू आहे. पण, जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत आहेत आणि या बॅंकेवर ‘नोटाबंदी’अंतर्गत विविध निर्बंध लादले गेल्याने, नोटाबंदीचा घाव शेतकऱ्यांच्या मुळावर बसला आहे. जिल्हा बॅंकेची कोंडी झाल्याने व्यवस्थापन हतबल आणि शेतकरी हवालदिल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात सर्व कारखान्यांच्या गाळप हंगामास गती आली आहे. साखरेचे समाधानकारक दर आणि उसाच्या क्षेत्रात घट झाल्याने सर्वच कारखान्यांकडून जास्तीत जास्त गाळप करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी अनेक कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे. गाळपाचा पहिला पंधरवडा संपल्याने पहिली उचल शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी जिल्हा बॅंकेचे खातेदार आहेत. यामुळे साखर कारखान्यांकडून येणारे उसाचे बिल जिल्हा बॅंकेत जमा केले जात आहे. पण, नोटाबंदींतर्गत जिल्हा बॅंकेत जुन्या नोटा स्वीकारण्यापासून अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. 

सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दिवसाकाठी एका खात्यावरून केवळ २० हजार रुपये देण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्हा बॅंकेत मागणीच्या तुलनेत पैसे उपलब्ध नसल्याने दिवसाकाठी अडीच हजार रुपये दिले जात आहेत.

यामुळे खात्यावर लाखो रुपये जमा होत असतानाही पैसे काढता येत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होऊ लागली आहे. उसाच्या बिलावर वर्षभराची मेहनत, बियाणे, खते तसेच वेगवेगळ्या कर्जाचे हप्ते, इतर उसनवारी, उधाऱ्या देण्याचे नियोजन असते. मात्र, सध्या पैसे काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. राष्ट्रीयकृत बॅंकेतही अनेक शेतकऱ्यांची खाती असली तरी, तेथेही पैसे काढण्याची मर्यादा असल्याने याही बॅंकांत शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांची बिले जिल्हा बॅंकेत जमा करतात. परंतु, सध्याच्या संभ्रमाच्या स्थितीत जिल्हा बॅंकेतील खातेदार शेतकरी ऊस बिले अडकल्याने मोठ्या आर्थिक कोंडीत सापडू लागले आहेत. येत्या काही दिवसांत याची व्यापकता वाढून, शेतकऱ्यांचा रोषही ओढवला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

शिथिल करा निर्बंध...
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अडचणी येऊ देणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजीपाला विक्री, खते, बियाणे खरेदी-विक्री तसेच उसाची येत असलेली बिले बॅंकांमध्ये अडकल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे काढताना रकमेच्या मर्यादा घालण्यात आल्या असल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतमालाच्या बिलांपोटी जमा होणारी रक्‍कम काढताना मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Web Title: currency ban problem for farmer