सध्या अण्णा काय करतात..

मार्तंड बुचुडे
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाउनपासून अण्णा ट्रेनिंग सेंटरमध्ये मुक्कामी आहेत. ते सकाळी पाच वाजता उठतात. परिसरातील मैदानावरच ते मॉर्निंग वॉक करतात. नंतर खोलीत जाऊन प्राणायाम व योगासनानंतर प्रातर्विधी उरकून नाश्‍ता घेतात. टीव्हीवर राज्य, देश आणि जगभरातील बातम्या पाहतात. नंतर त्यांचे वाचन सुरू होते.

 पारनेर ः कोरोनाने धुमाकूळ घातला आणि देशात लॉकडाउन झाले. त्यामुळे बहुतेक सर्व व्यवहार ठप्प आहेत. मोठमोठे राजकीय नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, क्रीडापटू व सर्वसामान्य जनतासुद्धा घरात बसली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेसुद्धा एका खोलीत स्वतःला बंद करून बसले आहेत. मात्र, या काळात ते वाचन आणि लेखनात मग्न आहेत. 

लॉकडाउनपासून अण्णा ट्रेनिंग सेंटरमध्ये मुक्कामी आहेत. ते सकाळी पाच वाजता उठतात. परिसरातील मैदानावरच ते मॉर्निंग वॉक करतात. नंतर खोलीत जाऊन प्राणायाम व योगासनानंतर प्रातर्विधी उरकून नाश्‍ता घेतात. टीव्हीवर राज्य, देश आणि जगभरातील बातम्या पाहतात. नंतर त्यांचे वाचन सुरू होते.

अण्णा सध्या "ज्ञानेश्वरी'चे वाचन करत आहेत. वाचनाचा कंटाळा आला की त्यांचे लोकपाल व लोकायुक्ताबाबत, तसेच देशातील काही सामाजिक व जलसंधारणाच्या प्रश्नांबाबत लेखन सुरू आहे. दुपारी दीडच्या सुमारास जेवण करून अण्णा काही काळ आराम करतात. नंतर पुन्हा वाचन व लेखन सुरू होते. 
दरम्यान, अधूनमधून अण्णा बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवतात. कोरोनाविषयी देशात व राज्यात जी भयंकर स्थिती ओढवली आहे, ती पाहायला विसरत नाहीत. पाच वाजता नारळपाणी किंवा ज्यूस घेतात. अण्णा रात्री जेवत नसल्याने कधी थोडाफार फलाहार घेतात व रात्री नऊच्या सुमारास झोपतात. 

राळेगणसिद्धी सुनसान 
राळेगणसिद्धी येथे लॉकडाउनपासून पर्यटकांना येण्यास बंदी आहे. अण्णांच्या भेटीला पर्यटक तर येतच नाहीत; शिवाय ते ग्रामस्थांनाही भेटत नाहीत. 22 मार्चपासून हजारे यांनी आपली कार्यालयेसुद्धा बंद केली आहेत. जे गाव नेहमी पर्यटकांनी गजबजलेले असे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक पर्यटकांनी गजबजलेले असे, ते आता ओके-बोके दिसत आहे.

ज्या राळेगणसिद्धीला आतापर्यंत लाखो लोकांनी भेट दिली, हजारे यांच्यासोबत सेल्फी घेतल्या, दररोज किमान पाचशेहून अधिक पर्यटक भेटी देत, त्या राळेगणसिद्धीत सध्या कोणीच फिरकत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Currently Anna Hazare is reading and writing