उसाच्या काटामारीने शेतकऱ्यांना कोटींचा फटका; सांगली जिल्ह्यात बेहिशेबी साखरेचा काळाबाजार

अमोल गुरव
Monday, 4 January 2021

काही कारखान्यांत काटामारीने जोर धरला आहे. यातून कोट्यवधीचा डल्ला मारला जात आहे. बेहिशेबी साखर सरळ काळ्याबाजारात जात असून, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे

सांगली ः ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चारही बाजूने लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकीकडे तोडकरी फडात तोड आणण्यासाठी पैशांची मागणी करीत आहेत; तर दुसरीकडे एकरकमी एफआरपी देण्याऐवजी तुकडे पाडले गेले आहेत. त्यातच काही कारखान्यांत काटामारीने जोर धरला आहे. यातून कोट्यवधीचा डल्ला मारला जात आहे. बेहिशेबी साखर सरळ काळ्याबाजारात जात असून, त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. काही कारखाने प्रामाणिक आहेत. मात्र काट्याची नियमित तपासणी करण्याकडे वजन-मापे विभागाने वारंवार दुर्लक्ष केले आहे.

जिल्ह्यातील 16 पैकी 14 कारखान्यांत दिवसाला सरासरी 70 हजार टन गाळप होत आहे. काही कारखाने उत्तम सुरू आहेत. काहींची काटामारी जोरात चालली आहे. जिल्ह्यात सरासरी 5 हजार टनांचा रोज काटा मारला जात असावा, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. त्याचा हिशेब करायचा झालाच तर तब्बल रोज दीड कोटींचा चुना कारखानदार शेतकऱ्यांना लावत आहेत. काही कारखानदार "आम्ही काटा मारत नाही' असा दावा छातीठोकपणे करतात; पण त्यांची हातचलाखी शेतकरीही जाणून आहेत. टनामागे 100 किलोपर्यंतचा काटा मारला जात असल्याची ओरड नेहमीची आहे. दहा टनामागे एक टन काटामारी होते. जिल्ह्यात सरासरी एका कारखान्याचे दिवसाला पाच हजार टन व त्यापेक्षा अधिक गाळप आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यात सरासरी रोज 500 टनाची काटामारी सहज होत असावी. त्यामुळे 14 कारखान्यांच्या गाळपानुसार अंदाजे हिशेब काढला; तर तो 5 हजार टनापुढे जातो. यामध्ये किमान रोज दीड कोटींचा चुना शेतकऱ्यांना लावला जात आहे. 

बायडिंगच्या नावाखाली घट 
काटामारीची सुरुवात बायडिंगची घट करण्यापासून होते. प्रत्येक खेपेला 100 ते 200 किलो बायडिंगच्या नावाखाली वजनात घट धरली जाते. अलीकडे मशिनद्वारे तोडणीचे प्रमाण वाढले आहे. त्यात उसाचे वाडे येत असल्याने "कटिंग' चे प्रमाण वाढवण्यात आले आहे. यात हातसफाई केल्यानंतर वजन घटवण्याचा प्रकार केला जातो. 

काटा तपासणीचा फार्स 
वजन-मापे विभागाकडून तपासणीचा फार्स केला जातोय. प्रत्येक कारखान्यावर वजन करण्यासाठी दोन काटे असतात. संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे, इलेक्‍ट्रिक रिमोट सेन्सरचा वापर करून दाब कमी-जादा केला जातो. सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन ठरलेले वजन प्रोग्रॅममध्ये सेटिंग केले जाते. कारखान्यावर वजनमाप अधिकारी गेटवर आल्याची माहिती समजताच यंत्रणा सावध होते. काटा "करेक्‍ट' केला जात असल्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असल्याची चर्चा आहे. 

संगणकीय प्रणालीत फेरफार 
काही कारखान्यात संगणकीय वजन प्रणालीतच फेरफार केला जातो. त्यासाठी वजन काट्यात फिडर गेज (लोड सेल) वापरले जाते. त्यावर उसाच्या वजनाचा दाब पडल्यानंतर त्यात इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक फोर्स तयार होते. वजन काट्यावरील सिस्टीम हा दाब सेन्सर करून त्याचे टन व किलोत रूपांतर करते. संगणकाच्या हार्डवेअरमध्ये फेरफार करून काटामारी केली जाते; स्क्रू-सेट करून दाब वाढवला जातो. परिणामी वजनात घट येते. 

खासगी काटेवालेही सामिल 
जिल्ह्यातील काही खासगी काटेवाले साखर सम्राटांच्या कटात सामील आहेत. एखाद्या शेतकऱ्याने उसाचे बाहेरून वजन केले; तर तो खासगी वजन काट्यातील कर्मचारी कोणत्या कारखान्याला ऊस जाणार आहे, त्याची माहिती काढून त्या व्यवस्थापनाला कळवतो. त्यामुळे बाहेरून वजन करून नेलेला ऊस हा तो कारखानदार गाळपास पाच ते सहा दिवस लावतो. त्यामुळे त्या ऊसाचे वजन आपोआपच कमी भरते. 

रात्रीची काटामारी 
काही ठिकाणी वजन काटे हायड्रोलिक प्रेशरवर चालवतात. मॅन्युअली ऑपरेट केले जातात. यात वजन केल्यानंतर पावतीवर आकडा लिहिताना हातचलाखी केली जाते. भरलेल्या वाहनाचे वजन कमी व रिकाम्या वाहनाचे वजन जादा दाखवण्याची चलाखी केली जाते. तसेच काटे कर्मचाऱ्यांद्वारे ऑपरेट करतेवेळी पायाने दाबल्या जाणाऱ्या हायड्रॉलिकच्या खाली लाकडी पट्टी ठेवली जाते. त्यामुळे काटा थांबून ठराविक टनापर्यंत ताणला जातो. ही काटामारी सर्रास रात्री केली जाते. 

एफआरपीबरोबर काटामारीविरोधात आंदोलन केले जाईल

जिल्ह्यातील काही कारखाने काटामारी करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एक-अडीच टनापर्यंत काटा मारला जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. वजन-मापे विभागाकडून कागदोपत्री तपासणी केली जाते. प्रत्यक्षात आर्थिक हितसंबंध गुंतले असण्याची शक्‍यता आहे. बाहेरून वजन करून आणला तर ऊस घेतला जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने दंगा केला तर वजन वाढवून दिले जाते. त्यामुळे एफआरपीबरोबर काटामारीविरोधात आंदोलन केले जाईल. 
- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cut practice in weight of Sugarcane cost farmers crores; Black market of unaccounted sugar in Sangli district