रब्बी पिकांसह द्राक्ष, भाजीपाल्याचे नुकसान; ऊसतोडी खोळंबल्या 

विष्णू मोहिते 
Friday, 8 January 2021

वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्‍यातील काही भागाला बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपले. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यातही हलका पाऊस झाला.

सांगली : वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्‍यातील काही भागाला बुधवारी मध्यरात्री पावसाने झोडपले. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यातही हलका पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, मात्र रात्री अचानक ढगांच्या गढगडाटासह सुरू झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह द्राक्ष आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने गुरुवारी बहुतांशी ठिकाणी ऊसतोडी खोळंबल्याचे चित्र पहायला मिळाले. 

येत्या दोन दिवस पावसाची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे, त्याचा द्राक्ष बागांचा फटका बसण्याची भीती आहे. आजही दिवसभर ढगाळ वातावरण, कडक ऊन असा खेळ सुरू राहिला. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यांच्या बहुतांश भागात तर विदर्भातील तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. शुक्रवार आणि शनिवारी कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज पश्‍चिम भागात बुधवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. अचानक ढगांच्या गढगडाटासह सुरू झालेल्या पावसाने रब्बीच्या पिकांसह द्राक्ष आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने गुरुवारी बहुतांशी ठिकाणी ऊसतोडी खोळंबल्या होत्या. ऊसतोड मजुरांच्या खोपटामध्येही पाणी शिरले होते. त्यामुळे मजुरांसह त्यांच्या कुटुंबाची दाणादाण उडाली. तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागातही रिमझिम पाऊस बरसला. 

जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अवकाळी पावसामुळे अडचणीत आला आहे. घडामध्ये पाणी साचल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी तयार केली जाणारी द्राक्षे मणी तडकल्याने नुकसानीत जाण्याची भीती आहे. बागावर औषधांची फवारणी करीत बागा वाचवण्याचे काम जोमात सुरू आहे. याशिवाय दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to grapes, vegetables, including rabi crops; The cane was dug