esakal | बोअर ब्लास्टिंग ठरताहेत घरांसाठी धोकादायक.... कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Damage to houses by bore blasting in Siddhewadi

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सिध्देवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथे बोअर ब्लास्टिंगचा वापर करून सुरू असलेल्या दगड उत्खनामुळे घरांची पडझड होत आहे.

बोअर ब्लास्टिंग ठरताहेत घरांसाठी धोकादायक.... कुठे ते वाचा

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सिध्देवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथे बोअर ब्लास्टिंगचा वापर करून सुरू असलेल्या दगड उत्खनामुळे घरांची पडझड होत आहे. तर दगडाच्या कपर्या घरावर व घरासमोर पडू लागल्यामुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ लागल्यामुळे दिलीप बिल्ड कॉन कंपनीचा परवाना रद्द करण्याचा ठराव सिध्देवाडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला. खाण बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 

रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामासाठी सिध्देवाडी ग्रामपंचायतीकडून दिलीप बिल्ड कॉन या ठेकेदार कंपनीने दगड उत्खननासाठी परवाना घेतला होता. वर्षभरापासून दंडोबा डोंगर पायथ्याला खाजगी खडकाळ जमीनीवर मुरूम उत्खननाचे कंपनीने काम सुरु केले आहे. 

मात्र दगड उत्खनन नियमबाह्य सुरु केल्याने त्याचा फटका खाण परिसरातील ग्रामस्थांना बसला आहे. भुसुरूंग उडविण्याला अधिकाधिक पाच ते सात फुटांची मर्यादा आहे. मात्र कंपनीने या मर्यादेचे उल्लंघन करीत शक्तीशाली बोअर ब्लास्टिंगचा पंचवीस फुटापर्यंत वापर करून दगड उत्खनन सुरु केल्याने सुरूंगाच्या धक्‍क्‍याने तडे जावून घरे धोकादायक बनली आहेत. घरांना भेगा पडून बांधकाम ढासळू लागले आहेत. सुरूंगाने उडालेले दगड घरावर पडून छताचे नुकसान झाले आहे.

याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेवून ग्रामपंचायतीने कंपनीला बोअर ब्लास्टिंग न करण्याची सूचना देवूनही ब्लास्टिंग सुरूच ठेवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडेही लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र घरांचे नुकसान होवून जीव धोक्‍यात आले तरी अधिकारीही ग्रामस्थांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत. कंपनीच्या अरेरावीला पाठबळ देत असल्याने सोमवारी मासिक सभेपूर्वी पदाधिकाऱ्यांना खाण बंद करण्याच्या मागणीसाठी बाळू माने, विठ्ठल नानगुरे, पोपट शिनगारे, भरमू नानगुरे, दादासो धडस, महावीर खोत यांच्यासह ग्रामस्थांनी धारेवर धरत खाण परवाना रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. सरपंच रामचंद्र वाघमोडे, उपसरपंच प्रथमेश कुरणे, अशोक गरंडे, बाळासाहेब व्हनमिसे यांच्यासह सदस्यांनी तक्रारीची दखल घेत दिलीप बिल्ड कॉन कंपनीला दगड उत्खनाचा दिलेला परवाना रद्द करण्याचा ठराव केला. 

काम थांबविण्याचा ठराव

बोअर ब्लास्टिंगमुळे गावातील जुन्या घरांची पडझड होतं आहे. यामुळे ब्लास्टिंगचे काम थांबविण्याचा ठराव करण्यात आला आहे. तहसिल, प्रांत कार्यालयांना याबाबात लेखी निवेदन दिले आहे. 

- रामचंद्र वाघमोडे, सरपंच सिध्देवाडी 

संपादन : युवराज यादव

loading image