पेड पाझर तलावाच्या पिचिंगवर झाडे उगवल्याने धोका

गजानन पाटील
Tuesday, 1 September 2020

पेड येथील पाझर तलाव दमदार पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. तलावाच्या पिचिंगवर मोठी झाडे उगवली आहेत.

पेड : येथील पाझर तलाव दमदार पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. तलावाच्या पिचिंगवर मोठी झाडे उगवली आहेत. तलाव पूर्णक्षमतेने भरल्याने पाण्याचा दाब हा भरावाच्या दिशेने असतो. पिचिंगच्या दगडामधून व वाढलेल्या झाडांच्या मुळ्या भराव्यात खोलवर जमिनीत जाण्याने भराव कमकुवत होऊ शकतो. त्याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन तलावाच्या पिचिंगवर उगवलेली झाडे तातडीने काढावी, अशी मागणी लोकांतून होत आहे. 
पेडपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर सन 1972 सालच्या दुष्काळात रोजगार हमी योजनेतून पाझर तलाव बांधला होता. तलाव पूर्णपणे मातीचा बांध घालून तयार करण्यात आला आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता ही 55.43 दशलक्ष घनफुट आहे. या तलावाच्या पिचिंगवर मोठी झाडे, झुडपे उगवली आहेत. त्याकडे संबंधित विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने लोकांतून नाराजीचे वातावरण आहे. 

तलावाची निर्मिती झाली तेव्हापासून आजअखेर देखभाल व दुरुस्ती झालेली नाही. तलावाच्या बांधावर दगडी पिचिंग केले आहे. अनेक वर्षांपासून उखडले आहे. त्याच पिचिंगवर मोठी झाडे, झुडपे उगवली आहेत. झाडांच्या मुळ्या खोलपर्यंत गेल्या आहेत. तलावाच्या पिचिंगचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचा तलावाला धोका होण्याची शक्‍यता आहे. ती झाडे तोडण्यास संबंधिताला वेळ नाही. 

मातीच्या बांधावर पिचिंग करण्यात आलेले दगड अस्ताव्यस्त पडले आहेत. तलाव पाण्याने भरलेला असतो त्यावेळी लोकांनी खेकडे पकडण्यासाठी गेल्यावर दगड विस्कटलेत. संबंधित विभागाने दुर्लक्ष केले. याच पिचिंगवर मोठी झाडे उगवल्याने दगड मातीच्या भरावावरून निखळू लागलेत. पाटबंधारे विभागाने झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danger from growing trees of the Ped percolation pond