साहेब, धंदाच बसलाय..पोटाला काय घालू, वेश्यालय पडली ओस

Darkness spreads in the red light area of ​​Ahmednagar
Darkness spreads in the red light area of ​​Ahmednagar

नगर ः कोरोनाने सगळ्यांचे धंदे बसले आहेत. लॉकडाउनमुळे सगळीकडे कुलूप लागले असले, तरी पोटाला कुलूप लावता येत नाही. गोरगरिबांना दानशूरांमुळे किमान दोन घास मिळत आहेत. किमान स्वयंसेवी संस्था त्यांच्या घरापर्यंत तरी जात आहेत. मात्र, सर्वाधिक फटका बसला आहे, तो रेड लाईट एरियातील सेक्‍स वर्करला. त्यांचा धंदा लोकांच्याच जीवावरचा. कोरोनाच्या भीतीने कोणी त्या वस्तीकडे फिरकतही नाही. 

मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये वेश्‍या वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. तशीच वस्ती नगर शहरातही आहे. अगदी तालुका स्तरावरही वेश्‍यांच्या वसाहती आहेत. श्रीरामपूर, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीगोंदा शहरात वेश्‍यावस्ती आहे. पोलिसांनी अनेकदा छापे मारले, तरीही त्या वसाहती काही बंद झाल्या नाहीत. आता मात्र, त्या सगळ्याच वस्त्या सुन्या पडल्या आहेत. चुकूनही त्या वस्तीत कोणी डुंकूनही पाहत नाही. 

ग्राहकच येत नसल्याने तेथील महिला हवालदिल झाल्या आहेत. त्यांची तर उपासमार होतेच आहे. परंतु त्यांचे अवघे कुटुंबच दोनवेळच्या अन्नाला मोताद झाले आहे. त्याही पलिकडे जाऊन त्यांच्या समस्या आहेत. काही तर शब्दांत न मांडण्यासारख्या. कारण जरी त्या मांडण्याचा प्रयत्न केला तर वाटेल, हे असं भयानक दारिद्रय असूच शकत नाही. 

""मेरा छोटा भाई इस साल बारावी में है, उसके एज्युकेशन के लिए पैसा जमा किया था, अब उसमें से आधा भि बचा नही. कैसे पढाई करू उसकी. मेराही दो टाईम का खाने का वांदा है...'' 
शिडशिडीत बांद्याची अपूर्वा (नाव बदलले आहे) सांगत होती. ती मूळ उत्तर प्रदेशातील. आता नगरला असते. तिला विचारलं, ""पढी-लिखी दिखती हो, फिर भी इस धंदे में?'' 
वो बहुत लंबी स्टोरी है बाबू... छोड दो... असं म्हणते तिने आपल्या पूर्वायुष्याविषयी बोलायचं टाळलं. तरीही खोदून विचारल्यावर म्हणाली, ""मैं तबही मर गयी थी, जब मेरे बाप ने मुझे बुढे आदमी को बेचा था. वो भि क्‍या करता? मैं ठहरी लकडी, उसके पास शादी के लिए पैसे नही थे...'' 
पुढे तिचा प्रवास कसा झाला असेल, हे अंदाजानेच कळालं. वडिलांनी तिच्या आयुष्याविषयी असा टोकाचा निर्णय घेतला असतानाही ती फॅमिलीसाठी खूप काही करते, स्वतःचा जीव जाळून. 
श्रीरामपूरच्या निर्मलाचे दुखणं तर आणखीच वेगळं आहे. ती काय नोकरी (धंदा) करते, हे तिच्या मुला-मुलीला माहिती नाही. ती शिकायला बाहेर असतात. लॉकडाउनमुळे आता ती घरी आलेत. कोरोनाच्या भितीने तिच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. त्या सगळ्यांचीच उपासमार सुरू आहे. तिने बचत केलेल्या पैशातून सोने खरेदी केलं होतं, आता ते मोडून ती दिवस काढते आहे. (सराफ कट्टे चालू नाहीत, पण काही तरी जुगाड करून तिने सोने विकलं.) 

वेश्यावस्तीतील महिलांव्यतिरिक्त काही मुलीही सेक्स वर्कर म्हणून नगर जिल्ह्यात काम करतात. किमान अशा दीडशे मुली आहेत.त्यांचे प्रश्न आणखीच वेगळे आहेत, असे सेक्स वर्करच्या समस्यांबाबत काम करणाऱ्या स्नेहालय संस्थेच्या प्रवीण मुत्याल यांचे म्हणणे आहे.

आम्ही करतोय त्यांच्यासाठी 
नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा येथे रेड लाईट एरिया आहेत. तेथे 450 महिला सेक्‍स वर्कर म्हणून काम करतात. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल येथील या महिला आहेत. कोरोनाने ही वस्ती सुनीसुनी झाली आहे. त्या महिलांनी जमवलेले पैसे तर केव्हाच संपले आहेत. त्यांची तर उपासमार होतेच आहे. परंतु त्यांच्यावर त्यांची कुटुंब अवलंबून आहेत. त्यांनाही उपासमारीचे चटके बसू लागलेत. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या माध्यमातून त्यांना धान्य वाटप केले आहे. परंतु समाजाने पुढे यायला पाहिजे. 
- प्रवीण मुत्याल, स्नेहालय, नगर. 

समाजाकडून दुजाभाव 
सर्वत्र मदत पोहोचवली जात आहे. मात्र, वेश्‍यावस्तीत कोणी धान्य किंवा फूट पॅकेट घेऊन जात नाही. कारण तिकडे गेले तर लोक काय म्हणतील, असे लोकांना वाटते. परिणामी भुकेने व्याकूळ झालेली ही वस्ती उपाशीच झोपते. नगरमधील सेक्‍स वर्कर यांना सामाजिक जाणीव आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटात त्यांनी आपल्या धंद्याच्या पैशातून मदत दिली आहे. कोल्हापूरचा पूर असो नाही तर तामीळनाडूतील त्सुनामी. प्रत्येक आपत्तीत त्यांनी मदत केली. आता समाजानेही या महिलांची दुःख ओळखली पाहिजेत, असे स्नेहालयच्या प्रीती भोंबे सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com