पहाटेच उरकले दशक्रिया विधी! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

शहरातील पाच जणांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. अमरधाममध्ये त्यांचे अंत्यविधी झाले. अंत्यविधीच्या वेळीच दशक्रिया विधीची तारीख जाहीर केली होती.

नगर ः घरातील आवडती व्यक्ती अचानक निघून गेल्यावर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र, कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरातील पाच कुटुंबांनी दु:ख बाजूला ठेवले. समाजहित लक्षात घेऊन "जनता कर्फ्यू'चे पालन करण्यासाठी आज चक्क पहाटेच दशक्रिया विधी उरकले. तेही मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत! 

शहरातील पाच जणांचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले. अमरधाममध्ये त्यांचे अंत्यविधी झाले. अंत्यविधीच्या वेळीच दशक्रिया विधीची तारीख जाहीर केली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी "जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन केले. नेमके आजच शहरातील पाच जणांचे दशक्रिया विधी होते. हा कार्यक्रम रद्द करणे किंवा एक दिवस आधी घेणे अशक्‍य होते. "जनता कर्फ्यू' सकाळी सातपासून सुरू झाला. त्यामुळे दु:खात बुडालेल्या या कुटुंबांनी दशक्रिया विधी आज पहाटेच उरकण्याचा निर्णय घेतला.

समाजहितासाठी या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. नेहमी सकाळी सातनंतर अमरधाममध्ये दशक्रिया विधीसाठी गर्दी होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यातून अमरधाम परिसरात सतत वर्दळ असते. मात्र, आज पाच दशक्रिया विधींसाठी फक्त 45 लोक उपस्थित होते. या पाचही कुटुंबीयांनी समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करताना, मृतांच्या आत्म्यास शांती मिळो, अशीच प्रार्थना अनेकांनी केली.  

गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाने काही कठोर निर्णय घ्यावेत. ते आपल्यासोबतच समाजाच्याही हिताचे आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dasakriya ritual performed in the morning