
दिवस मावळण्याआधीच घर जवळ करायची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
वाळवा (सांगली) : तांबड फुटले की शेतात आणि दिवस बुडल्यावर घरी परतायचे असा दिनक्रम सर्वसाधारण इथल्या शेतकऱ्यांचा असतो. पिढ्यानपिढ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेती पिकवणारा इथला शेतकरी अपार कष्ट करून पावसाच्या आशीर्वादावर शेती पिकवतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून तो भयभीत आहे. शेतात जाताना तो दहादा विचार करतो. आता तर दिवस चांगला वर आल्यावर शेतात जायचे. आणि दिवस मावळण्याआधीच घर जवळ करायची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.
वाळवा तालुक्यातील तुजारपूर, गाताडवाडी आणि लगतच्या येडेनिपाणी, गोटखिडी शिवारातील गेल्या आठ दिवसांतील हे चित्र आहे. आणि त्याला कारणीभूत ठरला आहे, तो सतत या शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी दृष्टीस पडणारा बिबट्या आहे. गेल्या रविवारी तुजारपूरचे पोलिस पाटील वसंत पाटील यांनी सायंकाळी बिबट्या पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुजारपूर परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ एका शेतकऱ्याला बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी येडेनिपाणी ते गोटखिंडी रस्ता ओलांडताना लोकांना बिबट्या आढळला होता.
हेही वाचा - तुमचं वाहन हरवलंय? संपर्क साधा : मिरज वाहतूक शाखेचे आवाहन -
आठवड्यात तीन वेळा जवळपास दहा चौरस किलोमीटर अंतरावर बिबट्या लोकांना आढळून आल्याने हा परिसर कमालीच्या दहशतीखाली आहे. तुजारपूर, गाताडवाडी आणि लगतच्या गावात बहुतेक शेती कोरडवाहू आहे. काही प्रमाणात सिंचन योजना आहेत. मात्र बागायती शेती कमीच आहे. सोयाबीन, भुईमूग, जिरायती ज्वारी ही पिके या भागात घेतली जातात. या परिसरातील शेतकरी बारा चौदा तास शेतात राबतात. काहींनी शेतातच जनावरे बांधली आहेत.
सध्या मात्र बिबट्याच्या दहशतीखाली हा परिसर आहे. त्यामुळे शेतात जाताना शेतकरी घाबरत आहेत. या तिन्ही गावांच्या आसपास बाभळीच्या झाडांची गर्दी लक्षणीय आहे. त्यामुळे जंगली श्वापदांना लपायला जागा आहे. शिवाय मल्लिकार्जुन डोंगराच्या बाजूला झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्याचे अस्तित्व सातत्याने या भागात आढळून आल्याने लोकांचा दिनक्रम बदलला आहे. तुजारपूरच्या पोलिस पाटलांनी पोलिस आणि वन विभागात याची कल्पना दिली आहे. मात्र वन विभाग याबाबत फारसा गंभीर नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांची फोडाफोडी; तासगाव तालुक्यात मोहीम -
"तुजारपूर आणि लगतच्या भागात बिबट्या आढळला आहे. वन विभागाने याची खातरजमा करून लोकांमध्ये असणारी भीती दूर करावी."
- वसंत पाटील, पोलिस पाटील, तुजारपूर ता. वाळवा
संपादन - स्नेहल कदम