
सांगली : कोरोनाच्या संसर्गाविरोधात प्रशासन लढत असतानाच आता पावसाळापूर्व नियोजनासाठीही कंबर कसली आहे. महापालिका आयुक्तांनी यंदा कृष्णेचा पूर रोखण्यासाठी सर्व बाजूंनी नियोजन केले असून, त्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांवर टाकली आहे. त्यांना मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे.
महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी कृष्णेच्या महापुराने हाहाकार माजवला होता. सुमारे पावणेदोन लाख नागरिकांना या महापुराचा फटका बसला होता. बाजारपेठेचेही अपरिमित नुकसान झाले होते. त्यावेळी महापुरास जबाबदार कोण, यावर बराच ऊहापोह करण्यात आला होता. त्यामुळे यंदा महापूर रोखण्यासाठी नालेसफाईपासून सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्ते सुस्थितीत आणणे, महापालिकेच्या इमारतींची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासणे, इमारत धोकादायक असल्यास पुढील कार्यवाहीची सूचना करणे, तत्काळ उपाययोजनांसाठी चोवीस तास पथक सज्ज ठेवणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे ही जबाबदारी शहर अभियंत्यांवर टाकली आहे.
नाले सफाई, रुंदीकरण तसेच गटारी स्वच्छ करणे यामुळे पाणी साचून राहणार याची दक्षता घेण्याची जबाबदारी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) यांच्यावर टाकली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट पुरवणे, खुल्या जागा तसेच अस्वच्छ मालमत्ता स्वच्छ करण्याबाबत जागामालकांना लेखी सूचना देण्याची जबाबदारीही टाकली आहे.
पावसाळ्यात नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर टाकली आहे. साचलेले पाणी काढण्यासाठी उपसा यंत्रणा तयार ठेवणे, विद्युत यंत्रणा सक्षम करणे, पाण्यात वीजप्रवाह उतरू नये यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यांवर टाकली आहे. ही सर्व कामे मेअखेर पूर्ण करण्याची डेडलाईन आयुक्तांनी दिली आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांवर आणीबाणी सेवेची जबाबदारी टाकली आहे. सुरक्षेचे साहित्य तयार ठेवणे, बोट पुरवठादारांची माहिती घेणे, आणीबाणीच्या काळात सुरक्षा व्यवस्थेचे मॉक ड्रील घेण्याची सूचना केली आहे. मंगलधाम येथे आपत्ती व्यवस्थापन केंद्रात वॉर रूम स्थापन करण्यात येणार आहे. वेदर मॉनिटरिंग स्टेशन कार्यान्वित करण्याची जबाबदारी सिस्टीम मॅनेजरवर टाकली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांवरही जबाबदारी
महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारती रिक्त करणे, निष्कासित करणे, तसेच नाले, गटारी, मलनि:स्सारण वाहिन्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांवर टाकली आहे.
मारुती चौकातील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार
सांगली : पावसाळ्यात नेहमी पाण्याचे बेट होणाऱ्या मारुती चौकातील ही समस्या आता सुटण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेकडून संस्थानकालीन भुयारी गटारांची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. आरवाडे हायस्कूलच्या पिछाडीस असलेल्या भुयारी नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे मारुती चौकातून जिजीच्या मारुतीकडे जाणारा नाला मोकळा झाला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वत: या भुयारी नाल्याची पाहणी करून आरोग्य स्वच्छतेबाबत सूचना केल्या.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मध्यवर्ती मारुती चौकापासून आनंद थिएटरपर्यंत पाण्याचे तळे होते. आयुक्त कापडणीस यांनी आरोग्य विभागातील जुन्या माहीतगार व्यक्तींशी चर्चा करून या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थानकालीन नाल्यातील गाळ काढल्यास मारुती चौकातील पाणी पुढे जाऊ शकते, असा निष्कर्ष निघाला. त्यानुसार या भुयारी नाल्याच्या स्वच्छतेला सुरवात झाली. यासाठी स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, याकूब मद्रासी आणि बंडा जोशी यांच्या उपस्थितीत नाले सफाईच्या ठेकेदाराचे कर्मचारी खोलवर असणाऱ्या चेंबरमध्ये उतरून आतील गाळ काढत आहेत.
मारुती चौकात पाण्याचा निचरा होईल
एक माणूस चालत जाईल इतका मोठा हा भुयारी नाला थेट नदीच्या अलीकडेपर्यंत जातो. या नाल्यातील गाळ काढल्यानंतर मारुती चौकात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तातडीने निचरा होईल. अनेक वर्षे गाळ काढला गेला नव्हता, त्यामुळे पाणी निचरा होत नव्हते.
- नितीन कापडणीस , आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.