चार दिवसाच्या "लॉकडाउन' नंतर मार्केट यार्डात सोमवारपासून सौदे 

घनशाम नवाथे
Sunday, 12 July 2020

सांगली-  "कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्डात चार दिवस कडकडीत "लॉकडाउन' केल्यानंतर सोमवार (ता.13) पासून शेतीमालाचे सौदे पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच धान्य विभाग देखील सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. 

सांगली-  "कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट यार्डात चार दिवस कडकडीत "लॉकडाउन' केल्यानंतर सोमवार (ता.13) पासून शेतीमालाचे सौदे पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच धान्य विभाग देखील सुरू होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच महापालिका क्षेत्रात "कोरोना' चे रूग्ण वाढत असल्यामुळे बाजार समिती, चेंबर ऑफ कॉमर्स, हमाल पंचायत आणि अडते, खरेदीदार यांनी 6 जुलै रोजी बैठक घेतली होती. बाजार समिती आवारात जिल्ह्यातून तसेच बाहेरून शेतकरी, खरेदीदार आदी येत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुळ, हळद आणि बेदाणा सौदे 8 ते 11 जुलैअखेर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच धान्य बाजार 9 ते 11 जुलैअखेर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मार्केट यार्डात चार दिवस कडकडीत "लॉकडाउन' पाळण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रूपयांची उलाढाल ठप्प झाली होती. 

चार दिवसाच्या बंदनंतर शनिवारी (ता. 11) पुन्हा सर्व घटकांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार बाजार समिती आवारात येणाऱ्या प्रत्येक घटकाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून सौदे सुरू करावेत असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुळ, हळद आणि बेदाणा शेतीमालाचे सौदे सोमवार (ता.13) पासून सुरू होतील. तसेच धान्य विभाग देखील सोमवारपासून सुरू करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सभापती श्री. पाटील यांनी केले. बाजार समितीमध्ये झालेल्या बैठकीस संचालक शीतल पाटील, मुजीर जांभळीकर, सचिव आर.ए. पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल, अडत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deals in the market yard from Monday after a four-day "lockdown"