"लक्ष्या'च्या मृत्यूने "शंकऱ्या'चे डोळे पाणावले ! 

विठ्ठल चौगुले
रविवार, 21 जुलै 2019

नूल (ता. गडहिंग्लज) येथे शेतकरी भीमाप्पा मास्तोळी यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला. "लक्ष्या' असे या मृत बैलाचे नाव. त्याच्या मृत्युने त्याच्या जोडीचा दुसरा बैल "शंकऱ्या'चे डोळेही पाणावले. मुक्‍या जनावरांमधील हा मायेचा ओलावा नूलकरांनी प्रत्यक्ष अनुभवला. 

नूल -  केवळ माणसांचं माणसावर प्रेम असते असे नाही. मुकी जनावरेही आपल्या सहकारी जनावरावर तितकेच प्रेम करतात. याची प्रचिती नूल (ता. गडहिंग्लज) येथे घडलेल्या एका घटनेवरून आली. शेतकरी भीमाप्पा मास्तोळी यांच्या बैलजोडीतील एका बैलाचा मृत्यू झाला. "लक्ष्या' असे या मृत बैलाचे नाव. त्याच्या मृत्युने त्याच्या जोडीचा दुसरा बैल "शंकऱ्या'चे डोळेही पाणावले. मुक्‍या जनावरांमधील हा मायेचा ओलावा नूलकरांनी प्रत्यक्ष अनुभवला. 

भीमाप्पा मास्तोळी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. हिरण्यकेशी नदी काठालगतच्या आपल्या शेतातील घरातच मास्तोळी कुटूंब वास्तव्य करते. कलाप्पा नडगदल्ली यांची शेती या कुटूंबाकडून कसली जाते. शेतीकामासाठी मास्तोळी यांनी बैलजोडी आणली. "लक्ष्या-शंकऱ्या' अशी या बैलांची नावेही ठेवली. मास्तोळी यांची मुले कुमार व संदीप दोघांनीही या बैलांवर जीव लावला होता. शरिरयष्टीने धिप्पाड असणाऱ्या या बैलांची शेतीकामात तोड नव्हती. यामुळे या बैलजोडीला मोठी मागणी होती. सदृढ बैलजोडी स्पर्धेतही लक्ष्या-शंकऱ्याने अनेकदा यश मिळवून दिले. दरम्यान, मध्यंतरी दीड लाखापर्यंत या बैलजोडीला मागणी आली होती. परंतु, पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या बैलांना विकण्यास मास्तोळी कुटूंबाचे मन तयार झाले नाही. 

तीन-चार दिवसापूर्वी "लक्ष्या' बैल अचानक आजारी पडला. डॉ. विराज वाघ, डॉ. बशीर बुढाण्णावर, डॉ. मनोज वाळकी यांनी औषधोपचार केले. तरीसुद्धा आजार कमी न झाल्याने रक्ताची तपासणी केली. या अहवालात लक्ष्याला विषबाधा झाल्याचे निदान झाले. त्यातच "लक्ष्या'ने अखेरचा घटका मोजला. "लक्ष्या'च्या अचानक जाण्याने "शंकऱ्या'ला दु:ख अनावर झाल्याचे त्याच्या हालचालीवरून लक्षात आले. सहकारी असलेला दुसरा बैल जागेवर सोबत नसल्याने दोन दिवसापासून त्याचे डोळे पाणावलेले असून त्याने गवत, पाणीही वर्ज्य केले आहे. या घटनेने संपूर्ण मास्तोळी कुटूंबाला धक्का बसला आहे. "लक्ष्या'वर अत्यंसंस्कार "शंकऱ्या'बरोबरच उपस्थितांचे मनही हेलावून गेले  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Bull tears in partner bull human interest story