स्वच्छता कर्मचाऱ्याचे कोरोनामुळे निधन; आठवड्याभरात दुसरा मृत्यू, वाचा कुठे

शंकर भोसले
Friday, 11 September 2020

मिरज (जि. सांगली) : शहरातील महापालिकेच्या प्रभाग 4 मधील स्वच्छता कर्मचाऱ्याचे गुरूवारी निधन झाले.

मिरज (जि. सांगली) : शहरातील महापालिकेच्या प्रभाग 4 मधील स्वच्छता कर्मचाऱ्याचे गुरूवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू होते. या आठवड्याभरात महापालिकेच्या स्वच्छता विभागातील दुसऱ्या कर्मचाऱ्याचे कोरोना संसर्गामुळे निधन झाल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाचाही कोरोना सदृष्य आजाराने मृत्यू झाला होता. यानंतर आज प्रभाग 4 मधील कर्मचाऱ्याचे निधन झाले. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना 50 लाख देण्याची मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेत 25 वर्षे बदली सफाई कामगार म्हणून काम करणारा हा कर्मचारी मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड सेंटरमध्ये काम करीत होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना आज त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कर्मचाऱ्यांच्यात खळबळ उडाली होती.

कोरोना साथीसोबत काम करीत असताना आवश्‍यक सुरक्षा साधने सफाई कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे, असा आरोप करीत संघर्ष कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मृताच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत व त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of cleaning worker due to corona; Second death in a week in Sangali