esakal | संसर्गासोबत वाढतोय मृत्यूचा आकडा; वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

बोलून बातमी शोधा

संसर्गासोबत वाढतोय मृत्यूचा आकडा; वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
संसर्गासोबत वाढतोय मृत्यूचा आकडा; वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
sakal_logo
By
बलराज पवार -सकाळ वृत्तसेवा

सांगली : गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढतोय तसा मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. लोक आधी आजार अंगावर काढतात आणि धाप लागल्यावर येतात. त्यामुळे वेळ न दवडता लक्षणे दिसताच स्वॅब द्या, चाचणी करून जीव वाचवा. याशिवाय शासनाच्या वतीने लसीकरण केले जात आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे भ्रमात राहू नये पुढचे वर्षभर काळजी घेण्याची गरज आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गतवर्षीपेक्षा जास्त रुग्ण आता झाले आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत मृतांचा आकडाही वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार एक एप्रिलपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 14902 ने वाढली आहे. याच काळात मृतांची संख्या 234 झाली आहे. हा दर 1.57 इतका आहे, तर गेल्या नऊ दिवसांत हाच दर 1.77 इतका झाला आहे. बाधितांचा आकडा याच नऊ दिवसांत 8,416 इतका वाढला आहे. याच काळात 149 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात एक दिवसात 1,174 रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्ण संख्या घटत गेली. यंदा हा विक्रमही पार करून दिवसाला 1,300 रुग्णांचा आकडा गाठला. मृतांचा आकडाही वाढत आहे. शिवाय हा आकडा कधी कमी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या तरी काळजी घेणे हाच यावरचा उपाय आहे.

याबाबत बोलताना जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. मालाणी म्हणाले, ""कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढल्याचे दिसते. भारतात पहिल्या लाटेवेळी दिवसाला 97-98 हजार रुग्ण आढळत होते. आता हाच आकडा साडे तीन लाखांच्या घरात गेला आहे. राज्यातही याच प्रमाणात परिस्थिती आहे. गेल्यावेळी 24-25 हजार रुग्ण दिवसाला आढळत होते. हाच आकडा आता 67-68 हजारांच्या घरात गेला आहे. लोक लक्षणे दिसतानाही आजार अंगावर काढतात. त्यापेक्षा लवकर चाचणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील उपचार घ्यावेत.''

लस घेतली तरी काळजी घ्यावीच

कोरोनाची लस घेणे नक्कीच चांगले आणि परिणामकारक आहे. पण, लस घेतली म्हणून भ्रमात राहू नये. लस घेतल्याने आजार गंभीर होत नाही. पण, व्हायरसचा एखादा व्हेरियंट असा निघू शकतो, की अँटीबॉडिजला दाद देणार नाही. ते आपल्या लक्षातही येणार नाही. हा व्हायरस सगळ्या हंगामात पसरला आहे. तो अतिथंड हवामानातही पसरला आणि 40-45 अंश तापमानातही पसरला आहे. त्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेणे हाच उपाय आहे.

दिवाळीनंतर दुसरी लाट येईल अशी शक्‍यता होती. पण, ती आली नाही. त्यामुळे लोक गाफील राहिले आणि कोरोनाचे नियम पाळले नाहीत. आता वेगाने लाट पसरली आहे. त्यामुळे कोरोनाची त्रिसूत्री पाळून ही लाट रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. एक मे पासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू होणार आहे. कोरोना गंभीर होण्यास प्रतिबंध करणे आणि तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.

- डॉ. आनंद मालाणी, सदस्य, जिल्हा टास्क फोर्स

Edited By- Archana Banage