झाडाची फांदी पडून कुस्तीपट्टू विक्रम मोरेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कोल्हापूर -  कोगे (ता. करवीर) येथे शेतात झाडाची फांदी अंगावर पडल्याने कुस्तीपट्टूचा मृत्यू झाला. पैलवान विक्रम भगवान मोरे (वय 24) असे मृताचे नाव आहे. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

कोल्हापूर -  कोगे (ता. करवीर) येथे शेतात झाडाची फांदी अंगावर पडल्याने कुस्तीपट्टूचा मृत्यू झाला. पैलवान विक्रम भगवान मोरे (वय 24) असे मृताचे नाव आहे. ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विक्रम आपल्या मित्रा सोबत देवस्थान मळी येथील शेतात झाडाच्या फांद्या तोडण्यास गेला होता. विक्रम फांदी तोडण्यासाठी झाडावर चढला होता. तर इतर चौघे मित्र फांदीला दोरी बांधून खाली थांबले होते. अचानक फांदी तुटली आणि थेट विक्रमच्या अंगावर येऊन पडली. विक्रम झाडावर दोन्ही फांद्याच्या मध्ये बसला होता. त्यामुळे त्याला हलता ही आले नाही. बराच मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. अशा अवस्थेत मित्रांनी त्याला झाडावरून खाली उतरून सीपीआर येथे दाखल केले. पण उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गावात मृतदेह आणताच नातेवाईक, ग्रामस्थांनी हंबरडा फोडला. मनमिळाऊ व चटकदार कुस्तीपट्टू विक्रमचा मृतदेह पाहून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कुस्ती शौकीनातून विक्रमच्या दुर्दैवी मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात होती. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिण व चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. 23) सकाळी 10 वाजता आहे.

नामांकीत मल्ल विक्रम

विक्रम हा नामांकित मल्ल होता. त्याने कुमार कामगार केसरी, पट्टणकोडोली केसरी तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ब्रांझ पदक यासह पुणे येथे झालेल्या महापौर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच कुंभी कासारी साखर कारखान्याचा तीन वेळा मानधनधारक मल्ल होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of wrestler Vikram More