दुष्काळी भागात कर्ज काढून जगणाऱ्यांचे व्यवसाय मोडकळीस 

नागेश गायकवाड
Thursday, 1 October 2020

दुष्काळाशी दोन हात करून व्यवसाय, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात धडपडणाऱ्या माणसांवर आभाळ कोसळलं आहे. कर्ज काढून जगण्याची धडपड करणाऱ्यांचे व्यवसाय मोडकळीला आले आहेत.

आटपाडी : दुष्काळाशी दोन हात करून व्यवसाय, उद्योग, कला, क्रीडा क्षेत्रात धडपडणाऱ्या माणसांवर आभाळ कोसळलं आहे. कर्ज काढून जगण्याची धडपड करणाऱ्यांचे व्यवसाय मोडकळीला आले आहेत. कुस्तीगीर, कलाकार साऱ्यांची फरफट सुरु आहे. आटपाडी तालुक्‍याला या संकटाने अवकळा यायला लागली आहे. अर्थकारण बिघडून गेले आहे. 

कोरोनाच्या महामारीतून खेडेगावे अद्यापही सावरताना दिसत नाहीत. हसत-खेळत जगण्याची मौज संपली आहे. पारावरचे गप्पांचे फड संपले आहेत. यात्रा, जत्रा, पारायण, विवाह सोहळे, कुस्त्याचे फड थांबले आहेत. शेतकरी, शेती, जनावरे, बारा बलुतेदार, त्यांचे व्यवसाय, मदतीला धावणारे शेकडो हात सारं थंड झालं आङे. सहा महिन्यांपासून गाडी रुळावरून घसरली आहे. गाव पांढरीला सावरायला संधीच मिळेना. या साऱ्या स्थितीवर "सकाळ'ने विविध क्षेत्रातील लोकांशी थेट संवाद साधला. 

महापौर केसरी रवींद्र गायकवाड म्हणाले, ""लोकसहभागातून आणि कर्ज उभारून मोठी तालीम उभारली. अनेक मल्लही सरावासाठी येत होते. माझ्या तालमीतील पंचवीसवर मल्लांच्या किमान 35 ते 40 कुस्त्या झाल्या नाहीत. परिणामी त्यांना खुराकासाठी आज पैसे नाहीत. हे सारे सराव करणारे मल्ल घरी परतलेत.'' 

जवळे मल्टीपर्पज हॉलचे मालक प्रसाद जावळे म्हणाले, ""तीन वर्षे उत्तम सुरु होते. वर्षात सत्तर कार्यक्रम व्हायचे. यावर्षी सोळा झाले, तेही किरकोळ. तीस कार्यक्रम रद्द झाले. कामगारांचा खर्च आणि केलेल्या गुंतवणुकीचे व्याजही निघाले नाही.'' 

महाराष्ट्र ब्रास बॅंडचे मालक सुनील आणि रणजित ऐवळे म्हणाले, ""तीस कलावंतांचं आमचं कुटुंब. जानेवारीत कर्ज काढून सर्व कलावंतांना गरजेप्रमाणे उचल दिली. यावर्षी दहा एक लाख रुपये दिले. लग्न, गणेशोत्सव, नवरात्र अशा 80 ते 90 सुपारी होतात. एक सुपारी 40 ते 65 हजाराची असते. यंदा एकही काम नाही. कलावंत मजुरीला जाताहेत.'' 

हॉटेल बंद करून किराणा दुकान 
आटपाडीतील स्वाद ढाबा आणि हॉटेलचे मालक अशोक लवटे म्हणाले, ""चार वर्षे चांगला व्यवसाय चालू होता. 14 लाखांची गुंतवणूक केली. कोरोनामुळे ढाबा बंद पडला. शासनाने परवानगी दिली असली तरी ग्राहक फिरकत नाहीत. हॉटेल बंद करून किराणा मालाचे दुकान चालू केले'' 
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt-ridden people in drought prone businesses