
सांगली : जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींच्या खातेवाटपाचा निर्णय सर्वसाधारण सभेच्या एक दिवस आधी म्हणजे 27 जानेवारी रोजीच होईल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचा निर्णय कोअर कमिटीत नेते करतील, सभापतींनी ताणाताणी करू नये, जाहीर चर्चा करण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांच्या नेत्यांमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड 2 जानेवारी, तर सभापती निवडी 7 रोजी झाली. त्यानंतर 20 दिवसांनी खातेवाटपाचा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षपदी मिरज तालुक्यातील म्हैसाळच्या प्राजक्ता कोरे, तर उपाध्यक्षपदी याच तालुक्यातील बुधगाव गटाच्या शिवाजी डोंगरे (माधवनगर) यांची निवड करण्यात आली. चारपैकी दोन सभापतीपदे आरक्षित होती. पैकी समाजकल्याण सभापतीपदी खासदार संजय पाटील समर्थक प्रमोद शेंडगे यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सुनिता पवार यांची निवड झाली.
आता उपाध्यक्ष आणि दोन सभापतींकडे उर्वरित खात्यांचे वाटप व्हायचे बाकी आहे. त्यात बांधकाम, अर्थ, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन या खात्यांचे वाटप होणार आहे. बांधकाम खाते हवे, असा आग्रह महाडिक गटाच्या जगन्नाथ माळी यांनी धरला आहे. ते मिळाले नाही तर राजीनामाही देऊ, असा गर्भित इशारा दिला जात आहे. सभापती निवडीनंतर त्यांनी घाईघाईत दुसऱ्या मजल्यावरील मावळते बांधकाम सभापती अरुण राजमाने यांच्या कक्षाचा ताबा घेतला. त्यामुळे याबाबतीत ते आक्रमक आहेत.
उपाध्यक्ष डोंगरे यांचा स्वभाव पाहता ते बांधकाम आणि अर्थसाठी हटून बसतील, असे चित्र समोर आले आहे. त्यांनी सध्या तरी मला अर्थ पाहिजे, असा सूर आळवला आहे. बांधकामबद्दल ते उघड बोलत नाहीत. भाजपमध्ये असे चालत नाही, याची त्यांना जाणीव आहे. मात्र ते बांधकामसाठी आग्रही राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. त्याला "सारीच खाती मिरजेला का?', असा आक्षेप घेण्याची तयारी सुरू आहे.
"शिक्षण' कोणाला ?
अडीच वर्षात शिक्षण विभाग सातत्याने वादग्रस्त ठरल्याने हे खाते नको, अशीच बहुतेकांची भूमिका आहे. कृषि आणि पशुसंवर्धनची जबाबदारी महिला सभापती आशाताई पाटील यांच्याकडे सोपवली जावू शकते. त्यांच्याकडे शिक्षणची जबाबदारी दिली, तरी त्या उत्तम सांभाळतील, अशीही नेत्यांत चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.