सातारा जिल्ह्यात विधानसभेतील अपक्ष लोकसभेसाठी निर्णायक ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कऱ्हाड दक्षिण-उत्तरेत कपबशी कमळ फुलविणार की, घड्याळ फिरविणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

सातारा / कऱ्हाड ः सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबर सुरू असल्याने विधानसभेच्या गणितांवर लोकसभेतील "राजा' ठरणार आहे. अत्यंत चुरशीच्या असलेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर मतदारसंघांत अनुक्रमे ऍड. उदयसिंह पाटील, मनोज घोरपडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही अपक्षांचे चिन्ह "कपबशी' असून, ही कपबशी कमळ फुलविणार की, घड्याळ फिरविणार, यावरून लोकसभेच्या रणांगणातील लढवय्यांचे यशापयश अवलंबून असणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
उदयनराजे भोसले हे खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे तगडे आव्हान आहे. लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होत असल्याने सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांतील मतदारांना लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभा अशी दोन मते देता येणार आहेत. त्यामुळे विधानसभेसाठीच्या उमेदवारांसोबत लोकसभेचे उमेदवारही प्रचारात सक्रिय आहेत. विधानसभेच्या उमेदवारांवर खासदारकीची गणिते अवलंबून असणार आहेत.

सातारा, वाई येथे राष्ट्रवादीविरोधात भाजप, कोरेगाव, पाटण, कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीविरुध्द शिवसेना असा सामना, तर कऱ्हाड दक्षिणमध्ये कॉंग्रेस विरोधात भाजप अशी लढत होत आहे. उदयनराजे महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांच्या प्रचाराची धुरा भाजप, शिवसेनेचे उमेदवार सांभाळत आहेत. श्रीनिवास पाटील हे आघाडीचे उमेदवार असल्याने राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे उमेदवार त्यांच्यासाठी बाजी लावत आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत थेट लढत होत असल्याने मतदानाची टक्‍केवारी कमी असते. शिवाय, एकच मत द्यावे लागत असल्याने "क्रॉस व्होटिंग'चा प्रश्‍न उद्‌भवत नाही. आता मात्र, दोन मते द्यावी लागणार असल्याने विधानसभेवर खासदारकी अवलंबून असणार आहे. वाईतून दहा, कोरेगावातून सात, कऱ्हाड उत्तरेतून सहा, कऱ्हाड दक्षिणेतून 13, पाटणमधून नऊ, तर सातारा विधानसभा मतदारसंघातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील महायुती, आघाडीचे उमेदवार ज्याचे त्याचे काम करतील. परंतु, अपक्ष उमेदवारांचे मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकणार, यावर लोकसभेचा "राजा' ठरणार आहे. 

लोकसभेच्या उमेदवाराला विधानसभेच्या उमेदवारांना सोबत घेऊन प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबत श्रीनिवास पाटील यांचा, तर शिवसनेचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासोबत उदयनराजे यांचा तसेच दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत श्री. पाटील तर भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत उदयनराजेंचा प्रचार होत आहे.

मात्र, कऱ्हाड दक्षिण-उत्तरेत विधानसभेसाठी तुल्यबळ अपक्ष उमेदवार असल्याने संबंधितांकडून विधानसभेला त्यांच्यासाठी मत मागितले जात असले तरी त्यांना मानणारा मतदार लोकसभेसाठी काय भूमिका घेणार? त्यांची मते लोकसभेत उदयनराजे की श्रीनिवास पाटील यांच्या पारड्यात पडणार, याची मोठी उत्सुकता आहे. 
कऱ्हाड दक्षिणेत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांनी निवडणूक अर्ज साधेपणाने दाखल केला असला तरी विंग येथे प्रचाराचा प्रारंभ मोठे शक्‍तिप्रदर्शन करत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

35 वर्षे कऱ्हाड दक्षिणचे नेतृत्व करताना उंडाळकरांनी रयत संघटनेच्या माध्यमातून गट बांधून ठेवला. त्यामुळे ऍड. पाटील यांची मतांची दक्षिणेत गोळाबेरीज मोठी आहे. त्याशिवाय कऱ्हाड उत्तरेत भाजपच्या माध्यमातून पाच वर्षे कार्यरत राहूनही उमेदवारी डावलल्याने बंडखोरी केलेल्या मनोज घोरपडे यांनी शक्‍तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्याबरोबरच त्याच दिवशी प्रचाराचा प्रारंभ केला. श्री. घोरपडे जिल्हा परिषदेचे भाजपचे विद्यमान सदस्य असून, कऱ्हाड उत्तरमध्ये त्यांचे कार्यकर्त्यांचे "नेटवर्क'आहे. त्यांची मतेही लोकसभेसाठी निर्णायक ठरणार आहेत. 

दक्षिण, उत्तर ठरणार "किंगमेकर' 

लोकसभेच्या सामन्यात कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर हे विधानसभा मतदारसंघ प्राबल्याने "किंगमेकर' ठरणार आहेत. विधानसभेच्या गत निवडणुकीत उंडाळकरांनी 60 हजार 413, तर मनोज घोरपडेंनी 43 हजार 903 मते घेतली होती. दोघांची मते लाखाहून अधिक असल्याने त्यांचे मतदार लोकसभेसाठी "किंगमेकर' ठरणार असल्याची स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decisive for the Independent Lok Sabha in the Satara district ?