
दर पाच वर्षांनी पशुगणना होत असली तरी त्यात सातत्य नाही. तथापि झालेल्या गणनेचा गेल्या दोन दशकांचा आढावा घेता सांगली जिल्ह्यातील घटते पशुधन चिंता वाढवणारे आहे.
दर पाच वर्षांनी पशुगणना होत असली तरी त्यात सातत्य नाही. तथापि झालेल्या गणनेचा गेल्या दोन दशकांचा आढावा घेता सांगली जिल्ह्यातील घटते पशुधन चिंता वाढवणारे आहे. एकीकडे जिल्ह्यातील ओलिताखालील क्षेत्र वाढत असतानाही जनावरांची संख्या कमी होण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करताना पुढे येतात.
कोरोनामुळे संकटात भर
दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. ताजी आकडेवारी उपलब्ध नाही, मात्र दोन वर्षे दुष्काळाने त्या तालुक्यांतील पशुधनाला झटका बसला. महापुरामुळे कृष्णा-वारणाकाठाला झटका बसला. मागील वर्षभर कोरोनाने या संकटात भर टाकल्याचे दूध उत्पादनातील घट पाहता दिसून येते. पुढची गणना 2022-23 मध्ये होईल. त्यावेळी नेमका अंदाज येईल. शेतकऱ्यांसमोरच्या संकटांचे स्वरुप वेगवेगळे आहे. मात्र पूर्वी घरटी दिसणारे एखाद-दुसरे जनावर आता दिसत नाही हेही खरे आहे.
- किरण पराग, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी
पौष्टिक चारा निर्मिती व्हावी
दोन वर्षांपूर्वी आम्ही हिरकरणी (बलवडी), हनुमान (बांबवडे), बलभीम (बोरगाव) या दूधसंस्थातील आकडेवारीचा अभ्यास केला. त्यामध्ये उत्पन्नातील 78 टक्के वाटा पशुखाद्यावर खर्च होत असल्याचे दिसून आले. पूर्वी शेतकऱ्याला जो खर्चच नव्हता. याचा स्पष्ट अर्थ आहे की चाऱ्याची पौष्टिकता या पशुखाद्याइतकी वाढवली पाहिजे. चाऱ्याबाबत विद्यापीठात होणारे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत येत नाही. पौष्टिक चाऱ्याचे उत्पादन घेऊन त्याची उपलब्धता शाश्वतपणे केली तरच दूध उत्पादन परवडेल. कुटुंबाचे सरासरी उत्पन्न पाहता आता यापेक्षा महाग दरात दूध घेणे एकीकडे परवडत नाही आणि शेतकऱ्याला या दरात दूध विक्री परवडत नाही. या कोंडीतून सुटका करायची झाल्यास पूरक म्हणून दिल्या जाणाऱ्या पशुखाद्याचा खर्चच कमी केला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातच पौष्टिक चाऱ्याची निर्मिती झाली पाहिजे.
- ऍड. संदेश पवार, उगम फाऊंडेशन
खासगी संघाची मक्तेदारी वाढली
दुष्काळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन होते. पूर्वी दूध उत्पादन हाच जगण्याचा मुख्य आधार होता. आता या तालुक्यांमध्ये ओलिताखालील क्षेत्र वाढल्याने दुधावरचे कुटुंबाचे अवलंबित्व कमी होत आहे. राबणूक आणि मिळकत याचा मेळ घालता शेतकरी पर्यायी पिके आणि अन्य रोजगाराकडे वळत आहे. त्यात दूध दराची शासनाकडून दिली जाणारी शाश्वती संपली आहे. खासगी संघाची मक्तेदारी वाढली आहे.
- मिलिंद पाटील, व्यवस्थापक, मोहनराव शिंदे दूध संघ
अर्थकारण न परवडणारे
पशुखाद्य-चारा आणि दुधाला मिळणारा दर पाहता पदरात शेणखतापलीकडे काही पडत नाही. भाकड जनावर पाळणे परवडत नाही. त्याच्या विक्रीवरही आता निर्बंध आहेत. चार वेतानंतर जनावर कसायाकडे जाते. त्यामुळे रेडकांची संख्या घटली. घरची पैदास असलेली जनावरे नाहीत. एकूण हे सारे अर्थकारण आता न परवडणारे आहे. घरचे दूध मिळतेय म्हणून एखाद दुसरे जनावर पाळणे आता परवडत नाही आणि तेवढी राबण्याची खेडुतांची इच्छाही राहिलेली नाही. त्याचे अंतिमतः परिणाम पशुसंख्येवर होत आहेत.
- वसंत पाटणे, शेतकरी, कवठेएकंद
जिल्ह्यातील पशुधन गणना
वर्ष | गायवर्ग | वाढ/घट | म्हैसवर्ग | वाढ/घट |
1997 | 276840 | -- | 467545 | -- |
2003 | 308310 | 31470 | 433341 | घट 44204 |
2012 | 341547 | 33237 | 492633 | वाढ 69292 |
2019 | 317660 | 23887 | 463410 | घट 29223 |
पशुसंवर्धन दृष्टिक्षेप
पशुवर्ग | 2012 | 2019 | घट |
गायवर्ग | 341547 | 317660 | 23887 |
म्हैसवर्ग | 492633 | 463410 | 29223 |
शेळ्या-मेंढ्या | 482022 | 450237 | 31785 |
सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादन (लाख लिटर्स)
दूधसंघ | एप्रिल 2019 | मे 2019 | जाने. 2020 | जाने 2021 |
सहकारी संघ (7) | 3,67,526 | 3,55,608 | 3,37,869 | 3,46,874 |
आंतरराज्य संघ (12 | 4,80,270 | 2,81,472 | 2,42,565 | 224789 |
खासगी संघ (12) | 6,78,724 | 5,99,274 | 6,40,948 | 648598 |
एकूण | 13,26,659 | 12,36,356 | 12,21,382 | 1220261 |
संपादन : युवराज यादव