बंगळूरमध्ये भडका : फेसबुकवर झाली पोस्ट व्हायरल अन् आमदाराच्या घरावर हल्ला ; हिंसाचारात तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

वादग्रस्त पोस्टमुळे बंगळूरमध्ये भडका

हिंसाचारात तीन ठार, पोलिस, नागरिक जखमी

कॉंग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला

बंगळूर : फेसबुकवर एका विशिष्ट धर्माची बदनामी करणारा मजकूर पोस्ट केल्यावरून बंगळुरातील बनासवाडी पोलिस उपविभागात मंगळवारी रात्री दंगल उसळली होती. हिंसक जमावाने कॉंग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. जमावाने यावेळी  घरांवर दगडफेक करून अनेक वाहने पेटवून दिली तर काही वाहनांची मोडतोडही केली. या दंगलीत तीन जणांचा मृत्यू झाला असून पोलिस कर्मचाऱ्यांसह ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री काठ्या, लोखंडी रॉड, धारदार वस्तू आणि इतर शस्त्रे घेऊन जमावाने आमदारांच्या घरात घुसून धुडगूस घातला. हिंसक घटनांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्यांवरही जमावाने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार कॅमेरे आणि मोबाईल हिसकावून घेऊन ते फोडून टाकण्यात आले. जमावाने डी. जे. हळ्ळी पोलिस ठाण्यासमोर वाहने एकत्रित करून त्यांना आग लावली. याशिवाय पोलिस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली.  

हेही वाचा- शिवाजी विद्यापीठाची बी. एड व एम. एडची डिग्री हवी असेल तर 60 हजार रुपये द्या! काय आहे व्हायरल मेसेजचे सत्य -

आंदोलकांनी ईशान्य विभागाचे पोलिस उपायुक्त भीमाशंकर गुलेड यांच्या गाडीवरही हल्ला केला. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत डीसीपींनी घटनास्थळाला भेट दिली असता पोलिस ठाण्याच्या गेटसमोर आंदोलकांनी त्यांना रोखले आणि दगडफेक केली. पोलिस कर्मचारी डीसीपींना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असतानाही जमावाने त्यांच्या वाहनावर हल्ला करून त्याचे नुकसान केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहन चालकालाही मारहाण केली.

भीतीने स्थानिकांचे पलायन
सहाशेहून अधिक जणांनी के. जी. हळ्ळी पोलिस ठाण्यावर हल्ला केला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हिंसाचार तासाहून अधिक वेळ सुरू होता. जमावाने जवळपासच्या घरांची व वाहनांची तोडफोड सुरू केली. त्यामुळे त्या भागात राहणारे रहिवाशी घाबरून मुले व महिलांसह घरे सोडून दुसरीकडे जात होते.

हेही वाचा- इकड़े आड़ तिकडे विहिर.... कुठल्या जिल्ह्यातील सर्वसाधारण रुग्णांची स्थिती झालीय बिकट... वाचा -

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी के. जी. हळ्ळी पोलिस ठाण्यासमोर हवेत गोळीबार केला. तरीही जमाव शांत झाला नाही. या हिंसाचारात एकाचा मृतदेह सापडला असून या व्यक्तीचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाला की गोळीबारात झाला याची पुष्टी देण्यास पोलिसांनी नकार दिला. पण, या हिंसाचारात एकूण तिघांचा मृत्यू झाला असून अनेक घरे व वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.सध्या बंगळूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. के. जी. हळ्ळी व डी. जे. हळ्ळी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  हिंसाचाराची पोलिस चौकशी करीत असून आतापर्यंत ११० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आमदारांचे आवाहन
आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे ज्यामध्ये त्यांनी सर्व धर्मीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या  हिंसाचारानंतर चामराजपेठचे आमदार बी. झेड. जमीर अहमद खान यांनीही घटनास्थळी धाव घेत के.जी. हळ्ळी पोलिस ठाण्याला भेट दिली. पोलिस आयुक्त कमल पंत यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा- कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत  40 टक्के मृत हृदयरोगाचे -

विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी
बंगळूरमधील हिंसाचार प्रकरणाची विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकास पोलिसांनी अटक केल्याचे समजते.

मुिस्लम तरुणांनी केले मंदिराचे रक्षण
एकीकडे समाजकंटकांनी जाळपोळ सुरू केली असताना येथील काही स्थानिक मुस्लिम तरुणांनी डी.जे हळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराभोवती मानवी साखळी तयार करून त्याचे संरक्षण केले. हे मंदिर पुलकेशीनगर भागामध्ये आहे. याचा व्हिडिओ व्हायरल  झाला असून त्यामध्ये हे तरुण दंगलखोरांना शांत राहण्याचे आवाहन करताना दिसतात.

हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर सरकार कारवाई करेल. हिंसाचार करणे, वाहने जाळणे कायद्याच्या विरोधात असून कोणत्याही समस्येवर हा तोडगा नाही. कोणत्याही विषयाचा कायदेशीर पाठपुरावा होवू शकतो. 
- बसवराज बोम्मई, गृहमंत्री

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: defamatory text post on Facebook in belgaum Three killed police civilians injured in violence