कोरोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कारास विलंब...अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे यंत्रणेवर ताण : एकाच स्मशानभूमीत सोय 

बलराज पवार
Monday, 31 August 2020

सांगली-  जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आता उद्रेक झाला आहे. गेल्या चार दिवसात दोन हजार रुग्ण वाढले. तर मृतांची संख्याही वाढत आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सुविधा मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्या सर्व रुग्णांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने उशीर होत आहे. 

सांगली-  जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात कोरोनाचा आता उद्रेक झाला आहे. गेल्या चार दिवसात दोन हजार रुग्ण वाढले. तर मृतांची संख्याही वाढत आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्काराची सुविधा मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्या सर्व रुग्णांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने उशीर होत आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात वाढला आहे. या महिन्यात तब्बल 8198 रुग्ण वाढले. जिल्ह्याचा मृत्यू दरही चार टक्के इतका आहे. तोही राज्यात नव्हे तर देशात जास्त आहे. जूनपर्यंत मृत्यूची संख्या कमी असल्याने पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे सोयीचे होते. मात्र आता मृतांची संख्या वाढल्याने वेळ लागत आहे. त्यामुळे नातेवाईकांना प्रतिक्षा करावी लागत आहे. 
कोरोनाचा उद्रेक झाल्याने सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरातील एकूण 15 हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण दाखल करण्यात येत आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधील रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत सुमारे सहा ते आठ तास वेळ लागत आहे. या सर्व काळात मृतदेहासोबत असणाऱ्या नातेवाईकांना मात्र वाट पाहत बसावे लागते. 

पंढरपूर रोड स्मशानभूमीत सोय 
कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी प्रशासनाने मिरजेतील पंढरपूर स्मशानभूमी निवडली. सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्ण मिरज शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. तेथे एखाद्याचा मृत्यू झाल्यास तो नातेवाईकांच्या ताब्यात न देता त्यांना फक्त कळवण्यात येत होते आणि ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत पीपीई कीटमध्ये गुंडाळून मृतदेह थेट अंत्यसंस्काराला नेण्यात येत असे. आजही हीच पध्दत सुरु आहे. मात्र आता मिरज शासकीय रुग्णालयाबरोबरच मिरज आणि सांगलीतील काही हॉस्पिटल्समध्येही कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात. तेथे रुग्णाचा मृत्यू झाल्यास तेथून सर्व प्रक्रिया आटोपून तो पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत नेण्यात येतो. 

दहन कट्टे वाढवले 
पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत सुरुवातीच्या काळात दहन कट्‌टे कमी होते. तसेच कर्मचारी अपुरे होते. लाईट, पाण्याची सुविधा नव्हती. कॉंग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी ही परिस्थिती आयुक्त नितीन कापडणीस यांच्या निदर्शनास आणल्या आणि तेथे या सुविधा करुन घेतल्या. तसेच दहनकट्ट्यांची संख्याही वाढवली. याशिवाय कर्मचारी संख्या वाढवण्यात आली. 

कर्मचारी कमी

गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रात कोरानाग्रस्तांची संख्या वाढली. त्यामुळे प्रशासनाला हॉस्पिटल ताब्यात घ्यावी लागली. महापालिकेने स्वत:चे कोविड सेंटर सुरु केले. तसेच गणेशोत्सव, मोहरम सणांमुळेही महापालिकेवर ताण आल्याने या स्मशानभूमीतील कर्मचारी कमी करण्यात आले. सध्या तेथे प्रत्येक शिफ्टमध्ये सहा कर्मचारी काम करतात. मात्र वाढत्या मृतदेहांची संख्येमुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा ताण वाढला आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुमारे तीन तास वेळ लागतो. त्यामुळे एकावेळी किमान सहा ते सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. असे दिवसभरात 20 ते 22 मृतदेह येतात. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी उशीर होत आहे. 

""मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी उशिर होत आहे ही वस्तुस्थिती आहे. महापालिकेचे कर्मचारी तेथे तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. मात्र मृतदेहांची संख्या लक्षात घेता ग्रामीण तसेच नगरपालिका, नगरपंचायतींच्या क्षेत्रातील कोरोनाबाधित मृतदेहांवर तेथेच अंत्यसंस्कार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे.'' 

-नितीन कापडणीस, 
आयुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delay in funeral of corona-affected victims. Stress on system due to insufficient staff: Facilities in a single cemetery