esakal | इथे "एनआरसी'साठी दाखल्यांना मागणी...

बोलून बातमी शोधा

 Demand for certificates for "NRC" in Sangali

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्यानुसार शासनाकडे पुरावे सादर करावे लागतील या शक्‍यतेने महत्वाचा दस्तऐवज असलेला जन्म दाखला काढण्यासाठी जन्म मृत्यू विभागाकडे गर्दी होत आहे.

इथे "एनआरसी'साठी दाखल्यांना मागणी...

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्यानुसार शासनाकडे पुरावे सादर करावे लागतील या शक्‍यतेने महत्वाचा दस्तऐवज असलेला जन्म दाखला काढण्यासाठी जन्म मृत्यू विभागाकडे गर्दी होत आहे. रोज 75 ते 100 अर्ज हे 1940 ते 1975 दरम्यानचे दाखले मागण्यासाठी येत आहेत. नियमित दाखल्यांची मागणी करणारे अर्जही येतात ते वेगळेच. या विभागावर ताण वाढला आहे. 

केंद्राने राष्ट्रीय नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू केला आहे. तर, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा कायदा झाल्यास आपले नागरिकत्व नोंदणी करावी लागणार आहे. आपली ओळख पटवणारी महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. जन्म दाखला महत्वाचा दस्तावेज ठरणार आहे. शासनाला पुरावा म्हणून सादर करण्यास गरज आहे. म्हणून जन्म दाखला काढण्यास गर्दी होत आहे.

मिरज रोडवरील मंगलधाम इमारतीत जन्म मृत्यू विभाग कार्यालयात सकाळपासून दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी गर्दी असते. अर्ज सादर केल्यापासून सात दिवसांत दाखला दिला पाहिजे, असा नियम आहे. मात्र सन 1970 पुर्वीच्या दाखल्याची माहिती शोधून दाखला तयार करून देण्याचे काम जिकीरीचे असल्याने त्यास पंधरा दिवस लागतात. 

जन्म मृत्यू विभाग पुर्वी महापालिका मुख्यालयाच्या परिसरात फिरत्या कार्यालयासारखा होता. जुने दाखल्यांचे रेकॉर्ड एके ठिकाणी, कार्यालय दुसऱ्या ठिकाणी आणि अधिकारी तिसऱ्याच ठिकाणी असत. आता एकाच जागेत सगळे कार्यालय आल्याने जुने रेकॉर्डही व्यवस्थित लावले आहे. त्यातही काही रेकॉर्ड जीर्ण झाल्याने नावे अस्पष्ट झालीत. दाखला देताना त्याचे पुरावे घ्यावे लागतात.

1937 पासूनचे दाखले 
या विभागाकडे 1937 पासूनचे दाखल्यांचे रेकॉर्ड आहे. सध्या 1940 ते 1975 सालापर्यंतच्या दाखल्यांना जास्त मागणी आहे. जुने दाखले मागण्यासाठी 75 हून अधिक अर्ज येतात. बहुतांशी अर्जाचे दाखले देण्यात येतात. काही कुटुंबातील 12, 15 20 सदस्यांच्या दाखल्यांची मागणी केली जाते. एकाचवेळी दाखले शोधून द्यावे लागत आहेत. 

शाळेचा दाखला महत्वाचा 
एखाद्या व्यक्तीचा जन्माचा पुरावा नसल्यास त्याचा शाळा सोडल्याचा दाखला घेतला जातो. मात्र त्यावर जन्मठिकाण असणे महत्वाचे आहे. न्यायालयातून शाळेच्या दाखल्यावरुन जन्म दाखला देण्याची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर रितसर दाखला दिला जातो. 

रेकॉर्ड वाचवल्याचा फायदा 
महापुरात जन्म मृत्यू विभाग मुख्यालयाजवळच्या आयुर्वेदिक दवाखान्यात सर्व जुने रेकॉर्ड होते. पुराचे पाणी कार्यालयात चार फुटांपर्यंत आले. या विभागातील आजम पटेल आणि सहकाऱ्यांनी सगळे रेकॉर्ड आधीच तेथून उंचावर सुरक्षित ठेवले. हे जुने रेकॉर्ड वाचवण्यात यश आले. त्यामुळेच आज 1940 पासूनचे दाखले देण्यात येतात. 

1936 च्या दाखल्याची मागणी

अलीकडेच पाठक नावाच्या व्यक्तीने 1936 च्या दाखल्याची मागणी केली. त्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार हा दाखला देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे श्री. पटेल यांनी सांगितले.