
शिराळा (जि. सांगली) : राष्ट्रीय आरोग्य अभियानमार्फत जोखमीचे काम करणाऱ्या आयुष व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी कमी मानधनावर काम करीत आहेत. आयुष कर्मचाऱ्यांच्या आयुष्याशी सुरू असणारा खेळ कधी थांबणार ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी "कोरोना' संकटातही रूग्णालयात रेड झोनमधून आलेल्यांची तपासणी करून 24 तास कर्तव्य बजावत आहेत.
पण, त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कुठल्याही सुविधा (भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय बिल, नियमित रजा, विमा संरक्षण)नाहीत. या अधिकाऱ्यांना आयुर्वेदिक चिकित्सेसह इतर तातडीच्या रुग्णांना (प्रसुती, विषबाधा, सर्पदंश, विंचू, श्वान दंश रूग्ण, अपघात झालेले रूग्ण, पोलिसांनी आणलेले आरोपी, एम.एल.सी. आदी कामे करवून घेतली जातात) अशांना दहा वर्षे रात्रंदिवस सेवा देत आहेत.
इतकी वर्षे असे काम करणाऱ्या आयुष डॉक्टरांना 22 व नवीन नियुक्ती दिलेल्यांना 28 हजार मानधन दिले जाते. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एम. बी. बी. एस. डॉक्टर काम करायला तयार होत नाहीत त्या ठिकाणी बी. ए. एम. एस. डॉक्टरांना तात्पुरत्या नियुत्या देऊन त्यांना 40 हजार मानधन दिले जात आहे. सर्वांची शैक्षणिक पात्रता एक असताना नवीन आणि जुना असा भेद का ? असा प्रश्न जुन्या नेमणुका असलेल्या आयुष्य डॉक्टरांना पडला आहे.
"कोरोना' च्या पार्श्वभूमीवर संशयित, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी, कोरोना केअर सेंटरच्या ठिकाणी सतत काम करावे लागते. त्यांना विमा सरंक्षण नाही. पी. पी. ई. किट नाही. अतिजोखमीचे काम करून तेवढा दाम मिळत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांत असंतोष आहे.
आज ना उद्या आमच्या कामांची दाखल घेतली जाईल या आशेवर रोज दिवस ढकलत नेमून दिलेले काम करीत आहेत. आयुष्यातील 10 वर्षे या सेवेत गेली. दुसरीकडे पुन्हा नवं करिअर कसे सुरू करायचे या विवंचनेत अनेक जण आहेत. तुटपुंज्या मानधनावर जोखीम पत्करून कसं जगायचं, संसार कसा रेटायचा याचीच त्यांना चिंता भेडसावते आहे.
शासनाने 17 हजार कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात भरती करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या ठिकाणी मानधनावर काम केलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे. त्यांच्या रिक्त ठिकाणी नवीन नियुक्त्या कराव्यात. तसे केले तर ही वेतनातील तफावत दूर होण्यास मदत होईल.
.. तर जगण्याची उमेदच संपून जाईल
गेली 10 वर्षे आयुषमध्ये काम करताना काहीनी 40 शी पार केली. शासनाने आता जर कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार केला नाही तर त्यांच्यातील जगण्याची उमेदच संपून जाईल.''
- डॉ. विशाल नलवडे, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी (कंत्राटी)
सरकारने पुनर्विचार करुन वेतन वाढ द्यावी
2008 पासून आम्ही काम करत आहे. आता गेले तीन महिने थेट कोरोना बाधित रुग्णांच्या सोबत विना तक्रार अहोरात्र काम करत आहे.आता सरकारने 30 हजार पेक्षा ही अधिक वेतन वाढ दिली पण आम्हाला त्याचा उपयोग नाही.विमा संरक्षण आहे पण त्याचा आता जगण्याला उपयोग होत नाही. त्यामुळे सरकारने पुनर्विचार करुन वेतन वाढ द्यावी.
- डॉ. नवरत्न गायधने, अध्यक्ष, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना
5500 कर्मचारी
सध्या महाराष्ट्रात आयुषचे 900 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत काम करीत आहेत. सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात 2250 वैद्यकीय अधिकारी, 1150 औषध निर्माता, 1150 परिचारिका कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.