ताणतणाव असणारच; उपाय शोधून राहा आनंदी! 

life
life

सोलापूर : जगण्यासाठीची धावपळ, करिअरसाठीची रॅटरेस, कामाच्या ठिकाणी सातत्याने बदलणारे वातावरण, बदलती आव्हाने, कौटुंबिक आणि संसारिक आघाडीवर होणारी ओढाताण अशा अनेक बाबींमुळे प्रत्येकजण कमीअधिक प्रमाणात तणावाखाली आहे. सोमवारी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ताणतणाव निवारण दिनानिमित्त "सकाळ'ने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचा ताणतणाव आहे. त्यावर उपाय शोधून रोजचं जगणं आनंदी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. 

दररोज सकाळी नियमित व्यायाम, योगा, फिरणे, पोहणे, नृत्य या सवयीमुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते. तणाव कमी होतो. मी दररोज न चुकता एक तास सकाळी निसर्गाच्या सानिध्यात घालवतो. दररोज 15 मिनिटे ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो, असे श्रीनिवास धुळे यांनी सांगितले. 

आपल्याला नक्की कशाचा त्रास होतोय हे समजून घ्यावे. आपल्याकडे असलेल्या वेळेचा आणि उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार केल्यास तणावमुक्त राहता येते. योग्य नियोजन केल्यास अडचणी येत नाहीत. आपल्या मर्यादा ओळखून काम करावे. कामामध्ये आनंद शोधल्यास ताण येणार नाही. 
- प्रसन्न खटावकर, मनसोपचार तज्ञ 

कौटुंबिक, व्यावसायिक ताणतणावापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आपले कामाचे व वैयक्तिक गोष्टींचे योग्य प्रकारे नियोजन करणं महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी आपले 100 टक्के योगदान देऊन आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली की कामाचा ताण वैयक्तिक आयुष्यात येणार नाही. कुटुंबाला पुरेसा वेळ देऊन आपण आपला तणाव घालवू शकतो. प्रत्येकाने सामाजिक कार्यात थोडातरी वेळ द्यावा, त्यातून आत्मिक समाधान मिळते. ते तणाव निवारणासाठी महत्त्वाचे आहे. 
- शिवराम सरवदे, फार्मा सेल्स मॅनेजर 

मी माझ्या क्षमतेनुसार काम करतो. क्षमतेपेक्षा जास्त कामामुळे ताण वाढतो. सतत काम करणे टाळावे. पुरेशी विश्रांती घ्यावी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या गरजा कमी कराव्यात. आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवून प्रयत्न करत रहावे. कुटुंबात नेहमी सकारात्मक विचार करावे. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवावे. आपण सतत चिडत तर नाही ना? हे पहावे. पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. या म्हणीतून काही शिकावे. मागचे अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतात. जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करत राहा. चर्चेने तणाव हलका होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनसोक्त हसा. 
- श्रीनिवास धुळे, नोकरी 

रोज सायंकाळी किमान तासभर घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून गप्पा मारायला हव्यात. वेळ मिळेल तेव्हा मित्रांसोबत गप्पागोष्टी करायच्या. मस्त चालत फिरायचं. आठवड्यातून एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात जायचं. काम तर करतच असतो. ताणतणाव घेऊन कमी होत नाही. 
- आदित्य बालगावकर, विद्यार्थी 

मला मानसिक ताण आला असेल तर मी चॉकलेट खाते आणि भरपूर झोपते. लहान मुलांसोबत खेळते, वेळ घालवते. कौटुंबिक ताण असेल तर एकांतात बसून स्वतःशी गप्पा मारते. सकारात्मक विचार करते. कोणाचा राग आला असेल तर सर्व कागदावर लिहून त्याची होडी करून पाण्यात सोडून देते. काही सुचत नसेल तर मग मस्त गाणी ऐकते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनसोक्त डान्स करते. तणाव मुक्त होण्यासाठी आवडीच्या गोष्टी करायल हव्या. 
- रसिका संत, नृत्य प्रशिक्षिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com