"बजेट'मध्ये असूनही उद्याने रखडली; प्रशासन आमराईवर मेहरबान

बलराज पवार
Tuesday, 5 January 2021

महापालिका प्रशासन सध्या आमराईवर चांगलेच मेहेरबान झाले आहे. मात्र महापालिका क्षेत्रातील इतर उद्याने धूळखात पडली आहे.

सांगली : महापालिका प्रशासन सध्या आमराईवर चांगलेच मेहेरबान झाले आहे. सुशोभीकरणासह अंतर्गत रस्ता, लॅंडस्केपिंग होणार आहे. तसेच मिनी ट्रेनही मंजूर केली आहे. मात्र महापालिका क्षेत्रातील इतर उद्याने धूळखात पडली आहे. वॉर्डनिहाय उद्यान उभारणीसाठी दोन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करुनही ते रखडले आहेत. तिकडे पहायला ना प्रशासन ना लोकप्रतिनिधींना वेळ नाही.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आमराईचे सुशोभीकरण मनावर घेतले आहे. तेथे सेल्फी पॉईंट, कृत्रिम धबधबा, आकर्षक लॅंडस्केपिंग करण्यासाठी 60 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातच आता खासगी तत्त्वावर 250 ते 300 मीटर लांबीच्या रुळावर मिनी ट्रेनही धावण्याचा संकल्प केला आहे. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पण, 118 चौरस किमी क्षेत्रफळाच्या महापालिका क्षेत्रात महापालिकेचे शेकडो भूखंड आणि उपनगरांमधील मोकळ्या भूखंडांमध्ये उद्याने विकसित करण्यात महापालिका प्रशासनाला निरुत्साह आहे. 

प्रत्येक प्रभागात उद्यानाला हरताळ 
महापालिकेचे सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात एकूण 20 प्रभाग आहेत. या प्रत्येक प्रभागात एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी महासभेत घेतला होता. महापालिकेच्या स्वत:च्या मोकळ्या भूखंडांमध्ये उद्याने साकारणार होती. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. भूखंडाच्या आकारमानानुसार सुमारे 30 ते 50 लाख रुपये उद्यान उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय झाला होता. मात्र यानंतर आजवर कोणतीही हालचाल झालेली नाही. 

मनपा क्षेत्रात 28 उद्याने 
महापालिका क्षेत्रात लहान मोठी अशी एकूण 28 उद्याने आहेत. यातील बहुतांश उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची वाट लागली आहे. अनेक उद्याने बंद आहेत. तर काही उद्याने झाडाझुडपांमध्ये हरवली आहेत. उद्यानांची स्वच्छता राखली जात नाही. काही ठिकाणी पाण्याचा प्रश्‍न आहे. तर काही उद्यानांमधील खेळण्यांची, बाकड्यांची अवस्था वाईट आहे. एकूणच उद्यानांच्या परिपूर्णतेकडे लक्ष देण्यास महापालिका अधिकारी, पदाधिकारी यांना वेळ नाही असे दिसते. 

आमराई, महावीरसारखी उद्याने व्हावीत 
आमराईप्रमाणेच महावीर उद्यानाचेही चांगल्या पद्धतीने संवर्धन केले आहे. तेथील लॅंडस्केपिंग, वॉकिंग ट्रॅक चांगला आहे. तेथे स्वच्छताही दिसून येते. बाहेरच्या बाजूस मनोरंजनाची साधने असतात. घोडेस्वारी, बॅटरीवर चालणाऱ्या लहान मुलांच्या गाड्या आदी बाबींमुळे सायंकाळच्या वेळी तेथे चौपाटीचे दृश्‍य दिसून येते. अशा पद्धतीने उपनगरांमध्ये उद्याने व्हावीत. 

तर या दोन उद्यानांवर ताण येणार नाही
कुपवाडमध्ये उद्यान होण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव दिला आहे. आयुक्तांनी जागेची पाहणीही केली आहे. महासभेतही प्रत्येक प्रभागात उद्यान उभारण्याचा ठराव झाला आहे. मात्र त्यानंतर कार्यवाही झालेली नाही. आमराई, महावीर उद्यानांसारखी उद्याने प्रभागांमध्ये झाली तर या दोन उद्यानांवर ताण येणार नाही. 
- प्रकाश ढंग, नगरसेवक, कुपवाड 

महापालिकेची उद्याने सुस्थितीत आहेत

महापालिकेची उद्याने सुस्थितीत आहेत. काही ठिकाणी पाण्याची अडचण आहे, खेळणी खराब झाली आहेत. मात्र अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी आहेत. उद्यानांची स्वच्छता केली जात आहे. नाना-नानी पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. अडचणी येतात पण, त्यावर मात करून उद्यानांची देखभाल केली जाते. 
- शिवप्रसाद कोरे, उद्यान अधीक्षक, महापालिका

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite of allocation in 'budget', the parks in bad condition at Sangali city