गेले सोनं लुटायला हाती आलं लोखंड 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

घुलेवाडी येथील सराफ ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी (वय 34) बुधवारी (ता. 5) दुकानातून घरी जात होते. घुलेवाडी शिवारात मागून मोटारीतून (एमएच 12 एनएक्‍स 4202) आलेल्या सहापैकी तिघांनी लोखंडी सळईने चिंतामणी यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. आतील चांदीच्या दागिन्यांची पिशवी पळविली. त्या वेळी मदतीसाठी धावलेल्या अविनाश सुभाष शर्मा (वय 36, रा. गुंजाळवाडी) यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या प्रकरणातीले हे आरोपी आहेत.

संगमनेर ः घुलेवाडी शिवारात सराफाला लुटताना त्यांच्या मदतीला आलेल्या युवकाचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तिघांना जेरबंद केले. गणेश राजेंद्र गायकवाड (वय 33, रा. घुलेवाडी), दीपक विनायक कोळेकर (वय 34, रा. नाशिक) व भरत विष्णू पाटील (वय 26, नाशिक), अशी त्यांची नावे आहेत. तीन आरोपींचा शोध सुरू आहे. 

चांदीच्या पायी... 
घुलेवाडी येथील सराफ ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी (वय 34) बुधवारी (ता. 5) दुकानातून घरी जात होते. घुलेवाडी शिवारात मागून मोटारीतून (एमएच 12 एनएक्‍स 4202) आलेल्या सहापैकी तिघांनी लोखंडी सळईने चिंतामणी यांच्या मोटारीच्या काचा फोडल्या. आतील चांदीच्या दागिन्यांची पिशवी पळविली. त्या वेळी मदतीसाठी धावलेल्या अविनाश सुभाष शर्मा (वय 36, रा. गुंजाळवाडी) यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

सीसीटीव्हीमुळे लागले धागेदोरे 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तीन पथकांद्वारे संगमनेर व बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यातून घुलेवाडी येथून आरोपी गणेश गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीत वरील दोघांसह अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलेवाडी), समाधान कुंडलिक गोडसे (रा. रिते सोलापूर, हल्ली रा. वाघोली, पुणे) व नीलेश (पूर्ण नाव समजले नाही, रा. नाशिक) यांची नावे पुढे आली. नाशिक येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

मारकेने मारले 
लुटीचा प्लॅन गणेश गायकवाड व अविनाश मारके यांनी तयार केला होता. गावठी पिस्तूल, पुणे येथून मोटार व अन्य साथीदार मारके याने जमा केले. घटनेच्या दिवशी गणेश गायकवाड याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंतामणी यांच्या दुकानातून चांदीची अंगठी खरेदी केली होती. त्या वेळी त्याने दुकान बंद करण्याची वेळ विचारली होती. त्याप्रमाणे महामार्गावर थांबलेल्या मोटारीतील साथीदारांना त्याने फोनवर माहिती दिली. अविनाश मारकेच्या कमरेला गावठी पिस्तूल होते. चिंतामणी यांच्या घराजवळ भरत पाटील, नीलेश, दीपक कोळेकर यांनी ऐवज लुटला. 

मित्राच्या मदतीला गेला अन 
दुचाकीवरून मदतीसाठी येणाऱ्या तिघांवर मारके याने गोळी झाडली. या गडबडीत एकच पिशवी घेऊन चोरांनी पळ काढला. ती चांदीची पिशवी होती. आता पकडले गेल्याने हाती केवळ कोठडीचे लोखंडी गज आले आहेत. नाशिकच्या दिशेने जाऊन निमोणमार्गे शिर्डी येथे लॉजवर मुक्काम केल्याची माहिती दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detainee arrested for robbing merchant