
जिल्ह्याला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील 15 वर्षात विकासाला एका निश्चित दिशेने गती देऊ. जिल्ह्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना प्रभावी बदल घडवून दाखवू, असा निर्धार व्हिजन सांगली ऍट 75 फोरमच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला.
सांगली : जिल्ह्याला साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील 15 वर्षात विकासाला एका निश्चित दिशेने गती देऊ. जिल्ह्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना प्रभावी बदल घडवून दाखवू, असा निर्धार व्हिजन सांगली ऍट 75 फोरमच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला.
फोरमची बैठक येथील सांगली ट्रेडर्समध्ये झाली. मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी स्वागत केले. ते म्हणाले, ""जिल्ह्याच्या सर्वांगिण, शाश्वत विकासासाठी हे फोरम स्थापन केले आहे. कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार या सात क्षेत्रात काम करायचा आहे. त्याचा मास्टर प्लॅन करून काम करू. वर्ल्ड बॅंक, नाबार्ड, खासगी संस्था, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा फायदा घेऊ.''
शिराळा दूध संघाचे बापू नायकवडी म्हणाले, ""कृषी विकासाला गती द्यावी.'' अखिल भारतीय डाळींब उत्पादक संघाचे सचिव आनंदराव पाटील म्हणाले, ""आटपाडी तालुक्यात औद्योगिक विकास घडवावा.'' टुरिझम ऑपरेटर असोसिएशनचे प्रकाश पाटील म्हणाले, ""कृषी पर्यटनाला चालना देण्याची मोठी संधी आहे.''
राज्य द्राक्ष उत्पादक संघाचे नेते सुभाष आर्वे म्हणाले, ""द्राक्ष, डाळींब, आंबा व इतर पिकांवर संशोधन केंद्र उभे करता येईल.'' उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, ""हा फोरम प्रगतीचे पाऊल ठरेल. शेतीमाल प्रक्रिया उद्योग व व्यवसायाला चालना द्यावी लागेल. शेतीवर अवलंबून लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठीच्या योजना राबवाव्या लागतील.''
ऍड. बाबासाहेब मुळी म्हणाले, ""अष्टविनायक दर्शन सहलीच्या धर्तीवर नवनाथ दर्शन संकल्पना जिल्ह्यात राबवता येईल. मिरज-विटा-दहीवडी-फलटण हा रेल्वे मार्ग झाला तर या भागाचा कायापालट होईल.''
राजाराम सोल्वेक्सचे व्यवस्थापकीय संचालक विकास कार्डिले म्हणाले, ""नवे उद्योग आकर्षित करणे, बंद उद्योगांना पुन्हा उभारी देणे, तांत्रिक समिती कायमस्वरुपी स्थान करणे, आर्थिक आणि मार्केटिंगसाठी व्यवस्थापन समिती नेमणे आदी गोष्टी प्राधान्याने करूया.''
सागर आर्वे म्हणाले, ""सामान्य सुविधा केंद्र ही जिल्ह्याची गरज आहे.''
फोरमचे सचिव राजगोंडा पाटील म्ङणाले, ""पाण्याचे काटेकोर नियोजन करणारा आराखडा हवा. पिकाचे एकरी उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा लागेल.'' रवींद्र यादव यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
संपादन : प्रफुल्ल सुतार