...म्हणूनच राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय धनंजय महाडिक यांनी घेतला

सुधाकर काशीद
रविवार, 1 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा कसा वाटा होता याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देऊनच राष्ट्रवादी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असे त्यांचे काका जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी आज सकाळशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना पराभूत करण्यात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा कसा वाटा होता याची माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देऊनच राष्ट्रवादी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असे त्यांचे काका जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी आज सकाळशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, 'धनंजय महाडिक राष्ट्रवादीत राहिले असते तरी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना सामावून घेतले नसते त्यांना एकाकीच पाडले असते.' आज धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला सोलापूर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश समारंभ झाला या समारंभाला महादेवराव महाडिक गेले नव्हते या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी बोलताना त्यांनी मुलगा भाजपचा आमदार, सून भाजपची जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता पुतण्या धनंजय भाजपमध्ये म्हणजे मी भाजपमध्ये आहेच की असे उत्तर दिले.

ते म्हणाले, 'धनंजय महाडिक यांच्यावर भाजपमध्ये जाण्याची वेळ राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमुळेच आली. वास्तविक शरद पवार यांचे धनंजयवर खूप प्रेम. त्यांनीच त्याला लोकसभेचे दरवाजे दाखवले. धनंजयनेही लोकसभेत वेगळे काम करून आपले व राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व दाखवले. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचे वेगळेपण ओळखून त्यांना भाजप-शिवसेनेची ऑफर नक्की होती. पण शरद पवारांवरील प्रेमामुळे त्याने पुन्हा हा राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. त्याने ही उमेदवारी घेतल्यावर त्याला राष्ट्रवादीतले कोण कोण मदत करणार. कोण करणार नाही हे आम्हाला माहीत नव्हते अशातला भाग नाही. किंवा आम्ही ते न समजण्याइतके नक्की दूध खुळे नव्हतो. पण पवार यांच्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीच्यावतीने लोकसभेची उमेदवारी स्वीकारली. ठीक आहे. काहीनी उघड विरोध केला. पण काहींनी आतून विरोध केला. पक्षाचे काम केले नाही. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. वास्तविक पवार यांच्यावर श्रद्धा नसती, तर निवडणुकीपूर्वीच धनंजयने पक्ष बदलला असता. त्याने राष्ट्रवादीकडून निवडणुकीचा जुगार खेळला नसता.

महाडिक म्हणाले, 'निवडणुकीचा सर्व लेखाजोखा पवार यांना दिला आहे. आता जिल्ह्यातील राष्ट्रवादीत धनंजय महाडिक राहिले असते, तरी त्यांना एकटेच पाडले गेले असते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आहेत. तेथे त्यांच्यावर तो पक्ष महत्त्वाची जबाबदारी देईल. आणि ती पार पाडली जाईल.

ते म्हणाले संपूर्ण महाडिक परिवार आता भाजपमध्ये आहे. पण आम्ही यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांनी आम्हाला मदत केली किंवा आम्ही ज्यांना मदत केली. त्यांच्या आमच्या नात्यात व्यक्तिगत पातळीवर कोणतेही ही राजकीय वैमनस्य येणार नाही.

आपल्याला मानणारा सोलापूर जिल्ह्यातला मोठा गट ही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात आपली मोठी ताकद भाजपच्या मागे उभी राहील.
- महादेवराव महाडिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Mahadik entry in BJP Mahadevrao Mahadik comment