esakal | सांगलीत आरक्षणासाठी धनगर समाजाचे 'ढोल बजाओ'
sakal

बोलून बातमी शोधा

Dhangar Samaj's 'Dhol Bajao' for Sangli reservation

धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्या, त्यांच्या हक्काच्या निधीचा वापर समाज हितासाठी करा, अशी मागणी करत आज समाजातील नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाभर ढोल बजाओ, सरकार जगाओ आंदोलन केले.

सांगलीत आरक्षणासाठी धनगर समाजाचे 'ढोल बजाओ'

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्या, त्यांच्या हक्काच्या निधीचा वापर समाज हितासाठी करा, अशी मागणी करत आज समाजातील नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाभर ढोल बजाओ, सरकार जगाओ आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधवांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 
आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन पुकारले आहे. स्वतः गोपीचंद यांनी पंढरपूर येथे विठुरायाच्या मंदिरासमोर ढोल वाजवून आंदोलन केले. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीसमोर, मंदिरांसमोर आंदोलन करण्यात आले. 

राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या दहा महिन्यात चकार शब्द काढलेला नाही. गेल्या सरकारने आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजाला सवलतींसाठी एक हजार कोटींची घोषणा केली, 500 कोटींची बजेटमध्ये तरतूद केली. या सरकारने तो निधी वापरला नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. त्यात घोंगडी, फेटा नेसून लोक सहभागी झाले. तरुणांनी सहभाग घेतला. शासकीय कार्यालय, मंदीर, ग्रामपंचायतीसमोरल आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, गजानन आलदर, संजय यमगर, नगरसेविका सविता मदने, संगीता खोत, लक्ष्मी सरगर, अमर पडळकर, दरिबा बंडगर, श्रीकांत वाघमोडे, भूपाल सरगर, सुरेश टेंगले, विनायक रुपनर, रमेश खामकर, संतोष रुपनर, शंकर हाक्के, सुभाष सरगर, महेश सायमोते, विनायक कोळेकर, अशोक सरगर, पंढरीनाथ महारुगडे आदी उपस्थित होते. 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top