परळी मागे पडली होती हो; आता बघा, पुढं कशी जाईल! 

डॉ. माधव सावरगावे
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

'मंत्री असूनही पंकजाताईंना परळीचा विकास करता आला नाही. तसा त्यांनी प्रयत्नही केला नाही. धनंजय मुंडे हे विरोधात असताना परळीच्या विकासासाठी प्रयत्न केले. जातपात, दिनदुबळा न म्हणता धावून आले. आणि आता बघा, मागे पडलेली परळी कशी पुढं जाईल', अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य परळीकरांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी दिली. 

परळी : 'मंत्री असूनही पंकजाताईंना परळीचा विकास करता आला नाही. तसा त्यांनी प्रयत्नही केला नाही. धनंजय मुंडे हे विरोधात असताना परळीच्या विकासासाठी प्रयत्न केले. जातपात, दिनदुबळा न म्हणता धावून आले. आणि आता बघा, मागे पडलेली परळी कशी पुढं जाईल', अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य परळीकरांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी दिली. 

सरकारनामा टीमने आज परळी शहरातल्या टॉवर परिसर, शिवाजी चौक, बाजार समिती परिसर, वैद्यनाथ मंदिर परिसरातील सर्वसामान्य कामगार, दुकानदार, व्यापारी लोकांची मते जाणून घेतली. परळीकर म्हणाले, 'धनंजय मुंडे यांनी नगर पालिकेत सत्ता असताना शहरातील रस्ते चांगले केले. दुकानदार, व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे नेत्यांनी नाही तर लोकांनीच ही निवडणूक उचलून धरली होती. आता परळीचा विकास होणार, हे नक्की आहे. तो आमचा विश्वास आहे'.

फुल्ल पाणी द्या; हाताला काम वाढवा 
गेल्या पाच वर्षात परळीत रोजगार कमी झाला आहे. सरकारने एमआयडीसी वाढवली पाहिजे होती. ती केली नाही. ताईंनीही त्यासाठी प्रयत्न केले नाहीत. थर्मल पॉवर बंद झाल्यानं रोजगार कमी झाला. त्या हाताला आता काम दिले पाहिजे. रोजगार वाढवण्यासाठी एमआयडीसी उभी केली पाहिजे. त्याशिवाय शहरातला ज्वलंत प्रश्न म्हणजे पाण्याचा. धनंजय मुंडे यांनी त्याला अधिक प्राध्यान्य द्यावं, अशी आमची मागणी असल्याचे परळीतील नागरिकांनी सांगितले. 

विकासरत्न धनंजय!
विकास करतात म्हणून आम्ही निवडून दिले. परळीत कधी चांगले रस्ते होते का?, आता कसे आहेत ते बघा. शांतता प्रस्थापित त्यांनी केली. सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणे, हाच खरा विकास म्हणावा लागेल. त्यामुळं आमच्यासाठी विकासरत्न हे धनंजय मुंडे हेच आहेत, असेही परळीकरांनी सांगितले.

गेल्या पंधरवाड्यापासून राजकीयदृष्ट्या ढवळून निघालेल्या परळीमध्ये आज धनंजय मुंडे यांच्या अभिनंदनाचे गल्लोगल्ली होर्डिंग्जस लागले आहेत. आचारसंहिता लागल्यापासून परळीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला होता. सभांचा धडाका, प्रचार फेऱ्या यामुळे परळीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं होतं. परळीतील जनतेनी विकासाला मतदान केलंय, विरोधी पक्षात असतानाही त्यांनी विकास केला होता. आता त्याला गती येईल, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य परळीकरांनी दिलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanjay munde won the Maharashtra vidhan sabha elections 2019