धीरज देशमुख यांचा "हा' आहे जीवाचा भाऊ

 Dheeraj Deshmukh talks about his brothers
Dheeraj Deshmukh talks about his brothers

संगमनेर : महाराष्ट्रातील विलासराव देशमुख यांचे तीन्ही चिरंजीव वलयांकीत आहेत. दोन राजकारणात तर एक सिनेसृष्टीत असल्याने ते वलय आणखीच विस्तारले आहे. तीनही भावंडांचा एकमेकांवर फार जीव आहे. रितेश सिनेमात असल्याने सर्वांच्या परिचयाचे आहेत. तर धीरज ही धाकटी पाती. तेही आता राजकारणात आले आहेत. त्यांच्या प्रचारात थोरले बंधू अमित आणि मधले बंधू रितेश हेही सक्रिय होते. या तिन्ही भावंडांनी प्रचारात केलेली भाषणे लोकप्रिय झाली. तीनही भावंडांचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. मात्र, धीरज यांनी जीवाच्या भावाबद्दल जाहीर खुलासा केला आहे. तो भाऊ नेमका कोण आहे? 

संगमनेरला युवा संवाद 
संगमनेर येथे युवा संवाद हा कार्यक्रम झाला. त्यात मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, झिशान सिद्धीकी हे सहभागी झाले होते. त्यांची मुलाखत गायक अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना धीरज यांनी दिलखुलास उत्तरे दिली. 


गुप्ते यांनी विचारल्या प्रश्‍नावर धीरज म्हणाले, रितेश आणि अमित यांच्यापैकी रितेशवर जास्त प्रेम आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांसह सहा तरुण आमदारांशी संगमनेरमध्ये संवाद साधण्यात आला. 

धीरज देशमुख यांना विचारलेले रॅपिड फायर 
1. सर्वाधिक प्रेम कोणावर? अभिनेता रितेश देशमुख की वैज्ञकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख 
उत्तर - रितेश देशमुख 
2. आवडता चित्रपट कोणता? लय भारी की तुझे मेरी कसम? 
उत्तर - लय भारी 
3. मुख्यमंत्री म्हणून भविष्यात कोणाला पाहायला आवडेल? आदित्य ठाकरे की रोहित पवार? 
उत्तर - दोन्ही 
4. धीर कोणी धरावा? उदयनराजे की संजय राऊत 
उत्तर - संजय राऊत (अप्रत्यक्ष उत्तर) 
करिअर निवडताना बॉलिवूड आणि राजकारण यांच्यापैकी राजकारणाचं पारडं कसं जड झालं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, लहान भाऊ म्हणून नेहमी माझ्यासमोर एक प्रश्न होता. मोठे भाऊ जे काम करतात त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत समोर जाण्याचे संस्कार घरातूनच झाले. त्यांचीही हीच अपेक्षा होती. माझा एक भाऊ राजकारणात आहे एक बॉलिवूडमध्ये. 

माझे बाबाच हिरो 
बाबांचा प्रवास आमदारकी, मंत्रीपद ते मुख्यमंत्री असा झालेला मी पाहिला. एक मुलगा म्हणून खंत असायची की माझे बाबा माझ्यासोबत कमी वेळ घालवतात. मला वडिलांचा सहवास फार मिळाला नाही. पण आज, निवडणूक लढताना, सभागृहात जाताना मला बाबा समजायला लागले, त्यामुळे बाबांनी समाजासाठी खूप केल्याचं जाणवलं. एखादा व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी खूप काही करु शकतो, पण इतरांच्या कुटुंबासाठी किती करु शकतो. माझे बाबा माझ्यासाठी हिरो आहेत, पण असे अनेक तरुण मला भेटतात जे म्हणतात, तुमचे बाबा आमचे हिरो आहेत, त्याचा अभिमान मला आजही वाटतो, असं धीरज देशमुखांनी सांगितलं. 

थोरातांबद्दल मोठा खुलासा 
बाळासाहेब थोरात हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्याशी आमचा स्नेह होता. बाबा मुख्यमंत्री असल्याने त्यांच्यासोबत विमानात फिरण्याचा छंद पूर्ण व्हायचा. बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या जेव्हाही बैठका किंवा दौरा असायचा. लातूरची कुठलीही अडचण असेल तर ते आवर्जून बाळासाहेबांना फोन करायचे, बाबांना माहित होतं की नगरपेक्षा जास्त न्याय ते लातूरला देऊ शकतील. 1999 साली बाळासाहेबांनी थोरात यांनी बाबांकडून कृषी खातं मागितलं आणि बाबांनी ते लगेच दिलं, असे धीरज यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न 
महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय हे दुष्काळमुक्तीसाठी घेण्यात आले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ त्या विचाराने चालत आहे. महाराष्ट्र हा नंबर एक होता आणि राहील हेच बाबाचं स्वप्न होतं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यापुढे महाराष्ट्रात विकासाचाच पॅटर्न चालेलं, असा विश्वास धीरज देशमुख यांनी केला. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com