
मिरज शहरातील ब्राह्मणपुरीत वृद्ध महिलेस मारहाण करुन लुटमार करणा-या संशयितास अखेर सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केवळ काही तासात अटक केली.
मिरज (जि. सांगली) : शहरातील ब्राह्मणपुरीत वृद्ध महिलेस मारहाण करुन लुटमार करणा-या संशयितास अखेर सांगलीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केवळ काही तासात अटक केली.
हबीबअल्ली रज्जाक हुसेन ईराणी (वय 20, ख्वाजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून लुटलेले सर्व दागिने जप्त केले आहेत. त्याचा अन्य एक साथीदार अद्याप फरारी आहे. त्याचाही येत्या काही तासात तपास लावण्यात येईल, असे गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.
सांगली गुन्हे अन्वेषण विभागाने माहिती दिली, की मिरजेतील ब्राह्मपुरीमध्ये रानडे वाड्यासमोर माधवी आठल्ये या महिलेच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे दागिने सोमवारी (ता. 8) संशयित हबीबअल्ली इराणी आणि साथीदारांनी आठल्ये यांना जमिनीवर पाडुन लंपास केले होते. मोटारसायकलवरुन येऊन या दोघांनी धुम स्टाईलने चोरी केली होती. या घटनेमुळे ब्राह्मणपुरीत घबराट पसरली.
नेहमीप्रमाणे शहर पोलिसांनी चार दोन सीसीटीव्हीची फुटेज घेऊन तक्रारदार महिलेचे समाधान केले. पण सांगली गुन्हा अन्वेषण विभागाने मात्र तातडीने माहिती काढून हबीबअल्ली रज्जाक इराणी या संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याने आणि त्याच्या साथीदाराने ही लुटमार केल्याचे त्याने कबूल केले. त्याला पुढील तपासासाठी मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिरजेत सलग तीन गुन्हे
संशयित रज्जाक ईराणी याने यापुर्वी मिरज शहरात असेच दोन गुन्हे केलेत. त्याची माहिती मिरज शहर पोलिस ठाण्यातील गुन्हा अन्वेषण विभागाला नाही का? एकच गुन्हेगार सलग तीन तीन वेळा मिरज शहरात तेच गुन्हे करतो तरीही त्याचा छडा लावणे दूर त्याचा बंदोबस्त करणेही पोलिसांना जमलेले नाही.