सांगली ग्रामीण भागात मधुमेह, रक्तदाबाचे सव्वालाख रुग्ण

अजित झळके
Wednesday, 25 November 2020

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार असल्याची माहिती समोर आली आहे.

सांगली ः सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार असल्याची माहिती समोर आली आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या उपक्रमातून झालेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. शहरी समजल्या जाणाऱ्या व्याधी झपाट्याने गावाकडे पसरत असल्याचे चित्र यातून समोर आले आहे. एकूण 23 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातील 5 टक्के लोक या आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट होत आहे. 

कोरोना संकटकाळात प्रत्येक घरापर्यंत जाऊन लोकांची काळजी घ्यावी, यासाठी राज्य सरकारने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेतली. निमित्त कोरोनाचे असले तरी या मोहिमेतून जिल्ह्यातील आरोग्य कुंडलीच समोर आली. ग्रामीण भागात 1 हजार 473 पथके तर शहरात 87 पथके अशा एकूण 1 हजार 560 पथकांकडून हा सर्व्हे करून घेण्यात आला.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 लाख 48 हजार 501 कुटुंबांना तर आष्टा, विटा, तासगाव, इस्लामपूर अशा शहरी भागातील 45 हजार 106 अशा एकूण 4 लाख 93 हजार 607 कुटुंबांना भेटी दिल्या गेल्या. ग्रामीण भागातील 21 लाख 6 हजार 202 तर शहरात 1 लाख 97 हजार 993 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यात अधिक ताप असलेले 2250, ऑक्‍सिजनचे प्रमाण 90 पेक्षा कमी असलेले 2 हजार 30 तर सारी व सदृश्‍य आजार असलेले 9 हजार 268 रुग्ण आढळले. याच सर्वेक्षणाने 2 हजार 200 हून अधिक रुग्ण कोरोना बाधित आढळले. 

या सर्वेक्षणातून समोर आलेली मधुमेह आणि उच्च रक्तदाबाविषयीची माहिती धक्कादायक आहे. कारण, हे आजार तुलनेत शहरी भागाचे मानले जाते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, छोटे व्यापारी गावाकडे राहतात. त्यांच्यात या आजारांना फारसा थारा नव्हता, मात्र नव्या शतकात या नव्या आजारांनी गावात प्रवेश करून पाय पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलती जीवनशैली, आहारातील अनावश्‍यक बदल, फास्टफूडचा प्रसार ही प्रमुख कारणे असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. यातील गंभीर बाब म्हणजे, कोरोनाने ज्यांचा मृत्यू झाला त्यापैकी 70 टक्के लोकांना मधुमेह होता, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास या सव्वालाख लोकांना विशेष सावधानी बाळगावी लागणार आहे. 

मधुमेहाची कारणे 

 • व्यायामाचा अभाव, बैठे काम, लठ्ठपणा 
 • अयोग्य आहार, फास्टफूड, मिठाई, बेकरीचे पदार्थ जास्त खाणे 
 • मानसिक ताणतणावाचे जीवन 
 • अनुवंशिक 

आजार आणि रुग्ण 

 मधुमेह 

 •  ग्रामीण  : 36 हजार 546
 • शहरी : 5 हजार 361
 • एकूण :41 हजार 907 

उच्च रक्तदाब 

 •  ग्रामीण : 52 हजार 93
 • शहरी : 7 हजार 674
 • एकूण : 59 हजार 767 

 रक्तदाब व मधुमेह 

 • ग्रामीण : 12 हजार 849
 • शहरी : 3 हजार 60
 • एकूण : 15 हजार 909 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diabetes, high blood pressure patients in Sangli rural areas