
मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभूमीची, डिझेल दाहिनीची आणि स्मशानभूमी परिसराची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी करून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तातडीने देण्याचे आश्वासन दिले.
मिरज (जि. सांगली) : मिरज कृष्णाघाट येथील स्मशानभूमीची, डिझेल दाहिनीची आणि स्मशानभूमी परिसराची महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पाहणी करून आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तातडीने देण्याचे आश्वासन दिले. गतवर्षी महापुराचे पाणी शिरल्याने बंद पडलेली डिझेल दाहिनीदुरुस्त झाली असून चारच दिवसांत ती कार्यान्वित होईल, असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर आनंदा देवमाने, नगरसेवक करण जामदार, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, श्रीराम नातू, सुनील मोरे उपस्थित होते.
कृष्णाघाट स्मशानभूमीसह घाट परिसरात लाईट आणि पाणी याची व्यवस्था नीट करण्याबाबत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्मशानभूमीच्या मागील बाजूस रक्षाविसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करणे, गरज पडल्यास दहन कट्टयाची संख्या वाढविणे या संदर्भात आयुक्तांनी पाहणी करून उपस्थितांशी चर्चा केली.
अर्जुनवाडपुलाच्या उजव्या बाजूस दशक्रिया विधी करण्यासाठी बांधलेल्या शेडचे काम गेल्या चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. "आधार' संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी याबाबत आयुक्तांना माहिती देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करून घेऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याची विनंती केली. आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर आनंदा देवमाने व नगरसेवक करण जामदार यांनी स्मशानभूमी परिसरात आवश्यक असलेल्या अन्य सुविधांची माहिती आयुक्तांना दिली. तसेच याठिकाणचा रस्ता व्यवस्थित करण्याची व स्मशानभूमी परिसरासाठी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी मिरजेसाठी एक नवीन शववाहिका घेण्यात आली आहे, मात्र त्यासाठी वाहन चालकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मिरज कृष्णाघाट स्मशानभूमीची देखभाल, डागडुजी व याठिकाणी आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी मिरजेतील "आधार सेवा संस्था' गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने येथे रंगरंगोटी, दरवाजे बसविणे, कट्टे दुरुस्त करणे, परिसरात गीतेतील श्लोक सांगणारे फलक बसविणे, पाण्यासाठी नळ बसविणे, निर्माल्यकुंड बसविणे अशी अनेक कामे करण्यात आली आहेत व येत आहेत. डिझेल दाहिनी दुरुस्त व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी सातत्याने वर्षभर पाठपुरावा सुरू ठेवला होता.
संपादन : युवराज यादव