'उत्तर सोलापूर'ची राष्ट्रवादी नाराज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड आज झाली. त्यामध्ये दोन्ही पदे काँग्रेसकडे गेली. निवडणुकीच्या सुरवातीच्या काळात जितेंद्र साठे यांना पद देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात तसे न झाल्याने उत्तर सोलापूर तालुक्‍यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांनी आपली नाराजी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रकट केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह इतर सर्व पक्षांना एकत्र करण्यात माजी आमदार दिलीप माने यांना यश आले होते. निवडणुकीतील यशानंतर सभापती जर काँग्रेसचा असेल तर उपसभापती पद हे राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला द्यायला हवे होते, असेही कार्यकर्त्यांमधून बोलले जात होते. मात्र, तसे झाले नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त सत्ता आणेपर्यंत सोबत आणि सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीला बाजूला काढणे कितपत योग्य आहे? असाही सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत. दोन्ही पक्षांनी आघाडी केली होती. तेव्हा सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापतिपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असायला हवे होते. उत्तर सोलापूर तालुक्‍यात जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्यामुळे बाजार समितीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या आहेत, असेही मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "सोशल' मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. 

बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीला संधी दिली नाही हे बरोबर आहे. सभापतिपदी श्री. माने हेच असायला हवेत. पुढील वर्षभरात राष्ट्रवादीला संधी मिळेल, ही अपेक्षा आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत ही गोष्ट खरी आहे. 
- बळीराम साठे, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The differences between North Solapur NCP and Congress