बंगाली कारागिराअभावी अनेक सराफांपुढे अडचणी: का?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

"लॉकडाऊन' मध्ये काम नसल्यामुळे निम्म्याहून अधिक बंगाली सुवर्ण कारागीर गावाकडे परतले आहे. त्यामुळे अनेक सराफांना नवीन दागिन्यांच्या "ऑर्डर' साठी प्रतीक्षा करावी लागत आहे. 

सांगली : चोख सोने आणि वेगवेगळ्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेली सांगलीची सराफ पेठ दोन महिन्यांनंतर सुरू झाली आहे. लॉकडाऊनमुळे ऐन लग्नसराईच्या काळात सराफ पेठेला मोठा फटका बसला. सध्या मोठ्या शोरूम्सचा अपवाद वगळता इतरांपुढे संकट आहे. तशातच "लॉकडाऊन' मध्ये काम नसल्यामुळे निम्म्याहून अधिक बंगाली सुवर्ण कारागीर गावाकडे परतले आहे. त्यामुळे अनेक सराफांना नवीन दागिन्यांच्या "ऑर्डर' साठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

सांगलीच्या पेठेत प्रत्येक सराफ व्यावसायिक वेगवेगळ्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहेत. काही सराफांकडे पिढ्यानपिढ्या ग्राहक येतात. नेकलेस, गंठण, मंगळसूत्र, पाटल्या, सोनसाखळी, कानातील टॉप्स यासह वेगवेगळ्या दागिन्यांची खासियत सराफांनी जपली आहे. दागिना उठावदार दिसण्यासाठी त्याचा आकार आणि नक्षीकाम महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे नक्षीकाम करणाऱ्या सुवर्ण कारागिरांना या व्यवसायात महत्त्व आहे. त्यामुळे काही दागिन्यासाठी मजुरीला जास्त पैसे मोजावे लागतात. 

सोन्याच्या दागिन्यावरील नक्षीकाम करणारी मंडळी ही बहुतांश बंगाली आहेत. स्थानिक कारागिरांपेक्षा अधिक सुबक आणि बारीक नक्षीकाम करण्यात या मंडळींनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे अनेक सराफांचे दागिने स्थानिक कारागिरांबरोबर बंगाली कारागीर बनवून देतात. रात्रंदिवस मेहनत करून बंगाली कारागिरांनी सराफ पेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गलाई, पॉलिश, जोडणी, नक्षीकाम यामध्ये ते माहीर आहेत. 

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर सराफ पेठ दोन महिने पूर्ण बंद होती. या काळात बंगाली कारागिरांचे हाल झाले. सांगली परिसरात जवळपास अडीच हजार बंगाली कारागीर आहेत. पेठ बंद असल्यामुळे काही सराफांनी त्यांना मदत केली. तसेच काही कारागिरांना थांबवून ठेवले. परंतु हाताला काम नसल्यामुळे लॉकडाऊन शिथिल होताच निम्म्याहून अधिक कारागीर बंगालकडे परतले आहेत. तर नुकतेच सराफ पेठ सुरू झाली आहे.

लग्न सराईच्या काळातच लॉकडाऊन झाल्यामुळे सध्या सराफांकडे दागिने आहेत. परंतु आता पेठ सुरू झाल्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन दागिने बनवण्यासाठी काही सराफांची अडचण निर्माण झाली आहे. विश्‍वासातले बंगाली कारागीर गेल्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. बंगाली कारागीर आता कुठे गावी गेल्यामुळे ते लवकर परततील अशी शक्‍यता नाही. त्यामुळे स्थानिक कारागीर व उर्वरित बंगाली कारागिरांवर अवलंबून रहावे लागेल. 
 

बंगाली कारागीर येण्याची प्रतीक्ष

निम्म्याहून अधिक बंगाली कारागीर गावी गेल्यामुळे सराफ व्यावसायिकांसमोर दागिने बनवून घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुंबई, अमृतसर, कोईमतूर येथून तयार दागिने येणे सध्या तरी शक्‍य नाही. त्यामुळे बंगाली कारागीर येण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे.'' 
- पंढरीनाथ माने,  सराफ व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties facing many jewellers due to lack of Bengali workers