‘डिजिटल शहराची’ मुहूर्तमेढ काळाची गरज

‘डिजिटल शहराची’ मुहूर्तमेढ काळाची गरज

‘अन्न-वस्त्र-निवारा’ या जरी प्राथमिक गरजा असल्या, तरी शहरांसाठी इंटरनेट सेवा बहुधा प्राथमिक गरज बनत चालली आहे. भारत सरकारने ‘डिजटल इंडिया’ उपक्रमाद्वारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सरकार आगामी काळात विविध उपाययोजना करणार आहे. यामध्ये राज्यातील प्रगत शहरांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी सांगलीला ‘डिजिटल शहराची’ मुहूर्तमेढ रोवणे काळाची गरज बनली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत म्हणाले, की पूर्वी शहरे नदीच्या किनारी वसली, त्यानंतर जिथे ‘हाय वे’ (महामार्ग) म्हणजेच चांगल्या दळणवळणाच्या सोयी उपलब्ध तिथे शहरीकरण वाढले; परंतु परिस्थिती बदलली आहे यापुढील काळात जिथे ‘आय-वे’ म्हणजेच ‘इन्फॉर्मेशन वे’ उपलब्ध असेल तेथेच शहरे वसली जातील. यातून आपल्याला बोध मिळतो तो म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढलेले महत्त्व. ज्ञान, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रात जर आपल्याला गती असेल, तरच आज आपण या स्पर्धेच्या युगात मोकळा श्वास घेऊ शकतो. संगणकाने आपले माहिती तंत्रज्ञानाचे जाळे जगभर पसरविले आहे. यात आपलं सांगली शहर किती डिजिटलकडे वळले आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात सांगली शहराची मागील काळातील एकही उल्लेखनीय कामगिरी नाही. स्मार्ट सिटी बनवण्यासाठी ई-गव्हर्नन्स सेवा, वेबसाइट या डिजिटल सेवांचा मोठा वाटा असतो. त्यात सांगलीकर पूर्णतः मागे आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आणि नव्या सरकारच्या सुधारित उपाययोजनांमुळे केंद्र आणि राज्य पातळीवर ‘ई-गव्हर्नन्स’मध्ये आमूलाग्र बदल घडले. राज्याचे ‘AapaleSarkar.in’ ही वेबसाईट तसेच सर्व सरकारी सुविधा अत्यंत सोप्या, सुसह्य आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित झाल्याचे दिसून येते, याचा थेट फायदा नेटिझन्सला झाला. गेल्या दोन वर्षात ‘ई-गव्हर्नन्स’चा बदललेला चेहरा पाहिल्यावर साहजिकच आपले शहर आताच्या घडीला इतरांच्या तुलनेत कुठे आहे याचा फरक नागरिक करायला लागलेत. ‘ई-गव्हर्नन्स’कडे योग्य लक्ष न दिल्याने जगाच्या मागे पडलोत का? असा प्रश्‍न इथल्या नेटिझन्सना आहे. वर नमूद केलेल्या वेबसाइटशी आपल्या महापालिकेच्या वेबसाइटशी तुलना केल्यास अनेक त्रुटी साध्या डोळ्यांना दिसून येतील. मुद्दा वेबसाइट तुलना हा नाही. परंतु पूर्वीच्या मानसिकतेतून बाहेर पडून महापालिकेने जे नवे, प्रगत, प्रमाणित आहे अशावर आधारित ‘डिजिटल शहराची’ मुहूर्तमेढ रोवणे ही काळाची गरज आहे. राज्यातील प्रगत शहरांच्या स्पर्धेत सांगलीनं माहिती तंत्रज्ञानातील प्रगती करणे यानिमित्ताने अपेक्षित आहे. 

डिजिटलच्या दिशेने... 
शहर डिजिटलकडे वळवत असताना साक्षरता महत्त्वाची आहे. माहिती तंत्रज्ञान हे आधुनिक काळातील शस्त्र आहे, परंतु आजही काही मंडळी वयोमानानुसार संगणक शिकण्यास व माहिती तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्यास घाबरतात. त्यांना संगणकाचे व माहिती तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक स्वरूपातील ज्ञान जाणून घेण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. डिजिटल शहरासाठी सरकारी यंत्रणेने सक्षम बनले पाहिजे. बेवसाइट रोजच्या रोज अपडेट झाली, तर अधिक वापर वाढेल. यासाठी सरकारी यंत्रणा एकटी पुरे पडणार नाही. त्याला लोकप्रतिनिधी, नागरिक, माध्यम यांची परस्परपूरक भूमिका असणे गरजेचे आहे. 

ग्रामीण भागालाही ‘स्मार्ट’पणा गरजेचा 
शहराबरोबरच ग्रामीण भागही स्मार्ट बनला पाहिजे. सरकारकडून सध्या चावडी, ताहसीलदार कार्यालये स्मार्ट केली गेली आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबत साक्षर बनवले तर प्रत्येकजण स्मार्ट बनले. माहिती तंत्रज्ञानातील साक्षरता याविषयी प्रबोधनात्मक कार्याक्रम हाती घेतले पाहिजेत, ग्रामीण भाग स्मार्ट झाला, तर शहरंही स्मार्ट बनतील, असे यातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

तज्ज्ञ म्हणतात

आयटीला आवश्‍यक गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ कोल्हापुरात उपलब्ध आहे; मात्र, प्रॉमिसिंग करिअरसाठी ते पुणे-मुंबईकडे धाव घेते. आयटीकडे गरज म्हणून पाहायला हवे. मार्केट खूप बदलले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी कोल्हापुरातच स्वत:ची कार्यालये उघडायला हवीत. जेणेकरून येथेच करिअर घडवता येईल.
- विनय गुप्ते 

कोल्हापूर आयटीमध्ये परदेशात सेवा पुरविणारा व नॉव्हेल संकल्पना येथेच राबविणारा असे दोन वर्ग आहेत. शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण सहसंचालकाची पहिली वेबसाइट येथेच तयार झाली. येथील नॉव्हेल संकल्पनांचे राज्यात अनुकरण होते; मात्र मोठ्या शहरांसोबत ‘कनेक्‍टिव्हिटी’साठी विमानसेवा व जलद रेल्वेसेवा उपलब्ध होणे आवश्‍यक.
- विश्‍वजित देसाई 

आयटीसंदर्भात जनजागृती करणे, हा उत्तम पर्याय आहे. या क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण स्थानिक लोकांसह राज्य व राष्ट्रीयस्तरावरील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक मॉडेल तयार करावे लागेल. ज्यामुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था येईल. आर्थिक तरतुदीपेक्षा तूर्त या घटकाला प्राधान्य दिले तर पुणे, मुंबईतील कामे कोल्हापूरकडे नक्कीच येतील. त्यांचा ओघ वाढत राहील.
- शांताराम सुर्वे

सॉफ्टवेअर व हार्डवेअरपैकी शासकीय कामे स्थानिक हार्डवेअर कंपन्यांना मिळावीत. या कंपन्यांची उलाढाल तीन ते चार कोटी असते. मात्र, शासन कामांचे टेंडर काढताना पंधरा कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देते. सॉफ्टवेअर व्हेंडरनाही सब कॉन्ट्रॅक्‍टिंगच्या रूपाने कामे मिळायला हवीत. ट्रेनिंग इन्स्टिट्युशन्सनाही बुस्ट करावे.
- अभिजित हावळ

टेक्‍नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. त्यातून जेवढे म्हणता येईल तेवढे फायदे आहेत, मात्र तोटेही खूप आहेत. सायबर गुन्ह्यासाठी त्याचा अधिक वापर होतो, मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीत त्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढू नये, यासाठी समाजाला तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे. शिवाय पोलिस यंत्रणेनेही यातील बारकावे समजून घ्यावे.
- विनायक राज्याध्यक्ष, सायबर फॉरेन्सिक अँड आयटी सिक्यूरीटी एक्सपर्ट, सांगली

कोल्हापूर आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ टेक्‍निकली खूप सक्षम आहे. त्यांना त्यांच्या सक्षमतेनुसार काम मिळावे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन कंपन्यांची संख्या वाढावी. मुंबई, पुण्यातील कंपन्या युकेमधील छोटे-छोटे प्रकल्प घेऊन काम करतात. तशी संधी येथील कंपन्यांनाही मिळविता येईल. त्यातून आयटीत करिअर करू इच्छिणाऱ्यांना रोजगार मिळेल.
- नीलेश पाटील 

डिजिटल इंडियांतर्गत येणाऱ्या काही वर्षांत ई-कॉमर्स क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी वेब आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स्‌ची यंत्रणा सक्षम करावी लागेल. यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सुविधांची ‘बॅंड विड्‌थ’ नव्याने उभारावी लागलेत. त्यात वायरड्‌ आणि वायरलेस असे दोन स्तर उभारावे लागलीत. ही यंत्रणा ग्रामीण भागातही पोचवावी.
- अशोक सावंत, लोटस्‌ कॉम्प्युटर, सांगली 

माहिती तंत्रज्ञान हे आताच्या तरुणाईचं जगण्याचं साधन बनलय. मूळात या क्षेत्रातील वेगामुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. त्यावर आपलं शहर स्वार व्हायचं असेल, तर त्या पद्धतीच्या सुविधा देणं गरजेचे आहे. ‘मेक इन इंडियां’तर्गत जिल्हा स्तरावर आयटी पार्क उभारले, तर स्थानिक तरुण परराज्यात जाणार नाहीत.
- आनंद क्षीरसागर, आयटी क्षेत्रातील नोकरदार

कोकणचा विचार करता येथे माहिती तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा होताना दिसत नाही. या क्षेत्रातील सोयी-सुविधा येथे उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. येथील विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञानाबाबत मानसिकताही बदलणे आवश्‍यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर येथील विकासासाठीही प्रभावीपणे करता येऊ शकेल. त्यासाठी आवश्‍यक तरतूद करावी
- संजीव देसाई, संचालक-भोसले नॉलेज सिटी

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील महाविद्यालयांतील आयटी अभ्यासक्रमामुळे कॉम्प्युटर अवेरनेस वाढला आहे. केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या डिजिटलायझेशनला कोकणातही चांगली सुरवात झाली आहे. कॉम्प्युटर हार्डवेअरप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रातही युवकांना चांगला रोजगार मिळेल. आयटी पार्क, कॉल सेंटर उभारल्यास कोकणात रोजगार उपलब्ध होतील.
- योगेश मुळ्ये, कॉम्प्युटर व्यावसायिक, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com