पहारेकरी लिमकरकडे डिजिटल सिग्नेचर

पहारेकरी लिमकरकडे डिजिटल सिग्नेचर

कोल्हापूर - फरकाची रक्कम काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणारा कुंदन लिमकर चार दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. हा लिमकर महापालिकेतील सहायक आयुक्त, अंतर्गत लेखापरीक्षक यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भारी पडला आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे ई-फाइलसाठी लागणारे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी) नाही; पण पहारेकरी या पदावर असणाऱ्या आणि पगार कारकुनाचा पदभार स्वीकारणाऱ्या लिमकरकडे मात्र डिजिटल साइन सर्टिफिकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लिमकर हा एकटा नाही, तर त्याला साथ देणारे अधिकारी, कर्मचारी यांची साखळी असल्याचे यावरून स्पष्ट होते.

महापालिकेच्या आस्थापन विभागात कुंदन लिमकर पगार कारकून आहे. लिमकरची मूळ नेमणूक पहारेकरी हीच असली तरी तो युनियनचा कार्यकर्ता असल्याने पगार कारकुनचा पदभार मिळण्यापर्यतचा त्याचा मार्ग सहज सुलभ झाला आहे. अनेकांची अडवणूक करून लिमकरने आंबे पाडल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत खाते त्या सर्व प्रकरणाचा तपास करतच आहे; पण महापालिकेचे प्रशासनदेखील या लिमकरवर कसे मेहरबान आहे, याचे काही नमुने समोर आले आहेत. 

आयुक्त पी. शिवशंकर यांनी महापालिकेच्या कामकाजात टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार ई-फाइल प्रणाली महापालिकेत सुरू केली. यासाठी अधिकाऱ्यांना डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट देण्यात आली. ही प्रणाली काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. त्यामुळे अजूनही सहायक आयुक्त सचिन खाडे, सहायक आयुक्त मंगेश गुरव, अंतर्गत लेखापरीक्षक आंधळे, एलबीटी अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी आर. के. पाटील यांसारख्या महापालिकेतील निम्म्यांहून अधिक अधिकाऱ्यांकडे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट नाही. 

या सर्व अधिकाऱ्यांना कुंदन लिमकर मात्र भारी पडला आहे. कुंदन लिमकर पहारेकरी असूनही त्याने डिजिटल सिग्नेचर पासवर्ड मिळविला आहे. तो पहारेकरी असला तरीदेखील कनिष्ठ अभियंता असल्याचे भासवून त्याने डिजिटल सिग्नेचर मिळविल्याची चर्चा आहे. डिजिटल सिग्नेचर व त्यासाठी लागणारा पासवर्ड देण्याचा अधिकार फक्त आयुक्तांच्या कार्यालयालाच आहे. तेथूनच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट त्याला मिळाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची अडवणूक करणे त्याला सहज सोपे गेले. लिमकरच्या कारभाराचे अनेक नमुने समोर येत असले तरी डिजिटल साइनचे प्रकरण आणखी वादग्रस्त ठरणार आहे.
 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा टेक्‍नॉलॉजीला हरताळ
आयुक्त पी. शिवशंकर यांचा टेक्‍नॉलॉजीवर भर दिसत असला तरी वरिष्ठ अधिकारीच याला हरताळ फासताना दिसतात. कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेतील बायोमेट्रिक ॲटेंडन्स सिस्टिम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याला सकाळी दहा वाजता इन करावेच लागते व सहा वाजता आउट करावे लागते. सकाळी दहा वाजता ऑफिसला यायचे असल्याने कर्मचारी सकाळी नऊ ते साडेनऊ वाजता घराबाहेर पडतात, मात्र काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन्स दिवसभर ओस पडलेली असते, तर रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत मात्र त्यांची कार्यालये बाजाराप्रमाणे फुललेली दिसतात. उपायुक्त विजय खोराटे यांच्यासह नगररचना विभाग, शहर अभियंता आधी कार्यालयांचा यात समावेश आहे. या कार्यालयात काम करणारे कर्मचारी व चालक यांची मात्र अडचण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com