दिलीपतात्या... चाळीस वर्षानंतर आले अन्‌ पाच वर्षे राहिले !

अजित झळके
बुधवार, 20 मे 2020

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या तालमीत तयार झालेले आणि जयंत पाटील यांच्यासोबत समांतर राजकारण करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिलीपतात्या पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाची पाच वर्षे आज पूर्ण केली.

सांगली ः लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या तालमीत तयार झालेले आणि जयंत पाटील यांच्यासोबत समांतर राजकारण करणारे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिलीपतात्या पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाची पाच वर्षे आज पूर्ण केली. "वाळव्यातून सांगलीच्या राजकारणात यायला मला चाळीस वर्षे लागली', असे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना सांगणाऱ्या दिलीपतात्यांनी पक्षांतर्गत विरोधकांचे बंड मोडून काढतानाच जिल्हा बॅंकेची विस्कटलेली घडीही बसवली.

यानिमित्ताने वाळव्याच्या परिघाबाहेर जिल्हाभर नेतृत्वाची चुणूक दाखवणाऱ्या दिलीपतात्यांनी या काळात विधान परिषद आणि लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता जिल्हा बॅंकेचा सुकाणू खाली ठेवल्यानंतर पुढच्या राजकारणात त्यांनी कुठे व कशी संधी मिळते, याकडे नक्कीच लक्ष असणार आहे. अर्थात, कोरोना संकट काळाने निवडणूका लांबणीवर पडल्या असल्याने त्यांना बॅंटिंग करायला अजूनही वाढीव संधी मिळाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी प्रशासक आणला. तो राष्ट्रवादीला मोठा दणका मानला गेला. सुमारे अडीच तीन वर्षांच्या प्रशासकीय काळात बॅंक सावरली, मात्र त्यावरील लोकांचा विश्‍वास कमी झाला. बॅंकेतील ठेवी घटल्या. व्यवहारावर मर्यादा आल्या. प्रशासक गेल्यानंतर नवे संचालक मंडळ येणार आणि बॅंक पुन्हा कशी सावरणार, असा प्रश्‍न होताच. त्या संकटकाळात बॅंकेची सूत्रे दिलीपतात्यांनी हाती घेतली. त्याआधी जिल्ह्याच्या राजकारणात एक अनपेक्षित भूकंप झाला होता. राजकारणातील कट्टर शत्रू जयंत पाटील, मदन पाटील आणि खासदार संजय पाटील यांची एकी होऊन ते येथे सत्तेत आले होते. त्यात भाजपचे विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख असे गटही सोबत होते. अर्थातच राष्ट्रवादीची पकड असलेले संचालक मंडळ सत्तेवर आले आणि अध्यक्षपदासाठी आमदार मानसिंगराव नाईक की दिलीपतात्या पाटील अशी रस्सीखेच झाली. त्यावेळी मानसिंगरावांना राज्य बॅंकेवर पाठवण्याचे ठरले आणि दिलीपतात्या अध्यक्ष झाले.

अध्यक्षपदी निवडीनंतर पहिल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""मला चाळीस वर्षे लागली सांगली जिल्ह्याच्या राजकारणात यायला. वेळ लागली, पण आता आलोय तर वाळव्याचं पाणी दाखवून देऊ.'' ही निवड एक वर्षासाठी आहे, अशा चर्चा सुरु होत्या. त्यावर ते म्हणाले, ""आज पहिला दिवस आहे, अजून किती दिवस राहतोय पाहू. त्यावर पहिल्या दिवशीच चर्चा कशाला?'' त्यांचे हे उत्तर किती समर्पक होते, याची जाणीव आज त्यांनी पाच वर्षे तळ ठोकल्यानंतर होते.
दोन हजार कोटींवर अडकलेला ठेवींचा आकडा याच काळात पाच हजार कोटींच्या पार गेला. नोटबंदीचे महाभयंकर संकट असतानाही बॅंकेला सावरण्यासाठी केलेली धडपड नक्कीच लक्षवेधी ठरली. ही दिलीपतात्यांनी राबवलेल्या ग्राहक संपर्क अभियानाची परिणिती होती. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना संपणार, असे आखाडे बांधले जात असताना त्यांनी राजकीय विरोध बाजूला ठेवून हा कारखाना वाचवण्याची भूमिका घेतली. ती यशस्वी झाली. कर्जपुरवठा करताना क्षमता पाहण्यासाठी कसोटी लावली. द्राक्ष, डाळींब, ऊस यांसह पिकांना हेक्‍टरी कर्जवाटपाची मर्यादा वाढवली. विदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना कर्जपुरवठा सुरु केला. ठेवीवर व्याजाचे दर वाढवले. विकास सोसायट्या अधिक्ष सक्षम केल्या. त्यासठी त्यांनी घेतलेले निर्णय बॅंकेला मजबूत करणारे ठरले.

एकीकडे हे सुरु असताना जिल्हा बॅंकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरु होती. 157 कोटीचा घोटाळा, 60 कोटीचा घोटाळा सतत चर्चेत येत राहिला. काही संचालकांनी तर दिलीपतात्या हटाव मोहिम सुरु केली. बैठकांवर बैठका झाल्या. जयंत पाटील यांना इशारा देऊन झाला. बंड झाले, झेंडे फडकले. पण, दिलीपतात्यांनी त्याला यश येऊ दिले नाही. राजारामबापूंच्या तालमीत तयार झालेल्या या मल्लाने अनेकांचे दुहेरी पट काढतानाच जयंतरावांचा आपल्यावरील विश्‍वास कमी होणार नाही, याची पुरेपुर खबरदारी घेतली. बॅंकेतील सर्वात मोठ्या नोकरभरती प्रकरणावर अनेकांनी बोट उचलले. त्यात काही व्यवहार झाल्याची चर्चा घडली. वाद झाले, तक्रारी झाल्या, मात्र "रंगात रंगून साऱ्या रंग माझा वेगळा अन्‌ गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा मोकळा' हे तत्व दिलीपतात्यांनी लागू पडले. त्या वादातून काही निष्पन्न झाले नाही.
दिलीपतात्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत. इस्लामपुरच्या मैदानात जयंतराव विरोधकांना जेरीस आणायला त्यांची वक्तृत्वशैली नेहमीच चर्चेत राहिली आहे. सदाभाऊ खोत यांना "फुटाणा मंत्री' म्हणून ते राज्यभर चर्चेत आले होते.

जयंतरावांच्या प्रमुख शिलेदारांपैकी एक आहेत. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा नक्कीच मोठी आहे. ती सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या विधान परिषद निवडणुकीवेळीही दिसली आणि सांगली लोकसभा लढवण्यासही ते इच्छुक दिसले. आता जिल्हा बॅंकेचा भार खांद्यावरून खाली ठेवताना त्यांना राजकारणात नव्या संधी द्याव्या लागतील. त्यांचा त्यावर दावा असेल आणि राष्ट्रवादीच्या बाणेदार, शैलीदार नेत्यांमध्ये त्यांचा समावेश असल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही त्यांचे वजन आहे. त्यामुळे जयंतरावांकडून या शिलेदाराची कुठे राजकीय प्रतिष्ठापना केली जाते, हे पाहणे औत्सुक्‍याचे असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip patil, came after 40 years and stey 5 year as chairman of dcc bank