थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर ऑब्जेक्‍शन

- संदीप खांडेकर
शनिवार, 11 मार्च 2017

ग्रेस गुणांची खिरापत - शालेय स्तर खेळाडूंवर अन्यायाची भावना : सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

ग्रेस गुणांची खिरापत - शालेय स्तर खेळाडूंवर अन्यायाची भावना : सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
कोल्हापूर - जिल्हा क्रीडा संघटनांकडून जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना ग्रेस गुणांची खिरापत मिळत असल्याने शालेय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाकडे जिल्हा संघटनांकडून ग्रेस गुणांसाठीच्या प्रस्तावाचा आकडा शालेय स्तरावरील खेळाडूंपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्हा क्रीडा संघटनांकडून मात्र जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंनाही ग्रेस गुण मिळावेत, यासाठी हालचाली सुरू असल्याचे संकेत आहेत. 

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत सहभागी खेळाडूंना जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर खेळावे लागते. जिल्हा क्रीडा संघटनांच्या स्पर्धेत विभागाला कात्री देऊन जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळाडू खेळविले जातात. सतरा वर्षांखालील कबड्डी हा क्रीडा प्रकार गृहीत धरून सांगायचे झाल्यास शालेय जिल्हास्तरावरील स्पर्धेनंतर विभाग स्तरीय स्पर्धेसाठी आठ विभागांतून प्रत्येकी बारा याप्रमाणे ९६ खेळाडू खेळतात. यातील पन्नास टक्के दहावी व पन्नास टक्के अन्य वर्गातील खेळाडू धरल्यास केवळ पन्नासभर खेळाडूंनाच ग्रेस मिळतात.

जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचा हा आकडा ४२० होतो. हे सर्व खेळाडू दहावीचे विद्यार्थी असतीलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे त्यातील २१० खेळाडू दहावीचे गृहीत धरल्यास हा आकडा शालेय स्तरावरील खेळाडूंपेक्षा अधिक होतो. जिल्हा संघटनांकडील खेळाडूंचा आकडा दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासाठी डोकेदुखीचा ठरतो. शालेय स्तरावरील खेळाडूंच्या संख्येपेक्षा जिल्हा संघटनांच्या खेळाडूंचा ग्रेस गुणांसाठीचा आकडा मोठा कसा, असा प्रश्‍न मंडळाला पडतो. त्यातूनच जिल्हा क्रीडा संघटनांनी २१ एप्रिल २०१५च्या शासनाच्या परिपत्रकानुसार विभाग स्तरावर स्पर्धा घेणे बंधनकारक आहे.

केवळ ॲथलेटिक्‍स, व्हॉलीबॉल, वुशू स्पर्धा विभागस्तरावर घेतल्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. तसेच संघटनांना राज्य संघटनेस संलग्न असल्याच्या पत्रासह तालुका स्तरावरील ७० टक्के संघटना संलग्नित असल्याची माहिती देणे आवश्‍यक आहे; पण विभागस्तरावर जिल्हा संघटना स्पर्धाच घेत नसल्याने माहिती देणार कोण, हीच अडचण आहे. 

ग्रेस गुणांचे क्रीडा प्रकार 
जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हा संघटना ज्या राज्य संघटनांशी संलग्नित आहेत, त्यांची यादी आहे. या क्रीडा प्रकारांचा आकडा एकोणतीस आहे. शालेय स्तरावरील ७१ पैकी ४२ क्रीडा प्रकारांना ग्रेस गुण दिले जातात. त्यामुळे पालक वर्गाने ग्रेस गुण असलेल्या क्रीडा प्रकारांची माहिती घेऊनच पाल्याला त्या त्या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण द्यायला हवे.

सुधारित ग्रेस गुण असे -

आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू 25

राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग 20

राज्यस्तर पदक सहभाग 15

Web Title: Direct state players playing on the Objection