esakal | त्याच्या वडीलांच्या अंत्यदर्शना साठी कर्नाटक जिल्हाधिकाऱ्यांची थेट राजस्थान सरकारला हाक
sakal

बोलून बातमी शोधा

Directors of Karnataka collectors call Rajasthan government for his father funeral

बेळगावात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या एका राजस्थानी व्यक्तीच्या वडीलांचा मृत्यू झाला. वडीलांच्या अंत्यदर्शनाच्या ओढीने त्याने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जिल्हा प्रशासनानेही राजस्थानला जाण्याची परवानगी दिली.

त्याच्या वडीलांच्या अंत्यदर्शना साठी कर्नाटक जिल्हाधिकाऱ्यांची थेट राजस्थान सरकारला हाक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेळगाव, ता. 14 ः बेळगावात स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेल्या एका राजस्थानी व्यक्तीच्या वडीलांचा मृत्यू झाला. वडीलांच्या अंत्यदर्शनाच्या ओढीने त्याने राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जिल्हा प्रशासनानेही राजस्थानला जाण्याची परवानगी दिली. राजस्थान सरकारशी चर्चा करून त्याला त्याच्या गावी पोहोचण्यासाठी आवश्‍यक परवानगी मिळविली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांची परवानगी घेऊन त्याला रविवारी (ता.12) बेळगावातून पाठविण्यात आले.

त्याच्या प्रवासासाठी खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून त्या वाहनाचे 30 हजार रूपये भाडे देण्याचे त्या व्यक्तीने मान्य केले आहे. त्याच्या सोबत आणखी दोघेजण राजस्थानला जाण्याच्या तयारीत होते, पण प्रशासनाने केवळ एकट्याचीच रवानगी केली आहे. बेळगावहून सुमारे 1500 किमी अंतरावर त्या व्यक्तीचे गाव असून त्याला सोडण्यासाठी गेलेल्या वाहनाचा 3 हजार किमी प्रवास होणार होता. त्यामुळे राजस्थानला जाणे व तेथून परत येण्याचे भाडेही वाहनचालकाने आकारले. 

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंगळूर येथून राजस्थान व मध्यप्रदेश येथे जाणाऱ्यांना बेळगावात स्थानबद्ध केले. गेल्या 20 दिवसांपासून त्यांचे बेळगावात वास्तव्य आहे. नेहरूनगर येथील समाजकल्याण खात्याचे वसतिगृह तसेच हालभावी येथील मोरारजी देसाई शाळेच्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले आहे. बेळगावातून त्यांना त्यांच्या राज्यात पाठविले जाण्याची मागणी सातत्याने ते करीत आहेत. पण लॉकडाऊन मागे घेतल्याशिवाय त्यांना सोडणार नसल्याची प्रशासनाची भूमिका आहे. 

अल्पोपहार व भोजनावरून त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी केलेला वाद, भोजनावरून दोन गटात झालेली हाणामारी यामुळे हे राजस्थानी व मध्यप्रदेशचे नागरिक सातत्याने चर्चेत राहिले. त्यामुळेच जिल्ह्याचे पालक सचिव अतिक यांनी नेहरूनगर येथे भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला, मात्र त्याना 15 एप्रिलनंतर त्यांच्या गावी पाठविण्याचा निर्णयही जाहीर केला. यामुळे ते सर्वजण खूष झाले होते. नेहरूनगर येथील वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या राजस्थान येथील एका व्यक्तीच्या वडीलांचे रविवारी निधन झाले. त्याची माहिती त्याने महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिली. यावेळी त्याने मला राजस्थानला पाठवा अशी विनंतीही केली. महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर राजस्थान सरकारशी चर्चा करून त्या व्यक्तीला राजस्थानमध्ये प्रवेश देण्याबाबतची रितसर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर बेळगाव जिल्हाधिकाऱ्यानीही परवानगी दिली. राजस्थानला जाण्यासाठी खासगी वाहन हा एकच पर्याय उपलब्ध होता पण त्यासाठी भाडे आकारणी जास्त होणार होती. सर्व भाडेरक्कम देण्याची तयारी त्या व्यक्तीने दाखविली, त्यामुळे मग एक वाहन भाडेतत्वावर घेऊन प्रशासनाकडूनच त्याला राजस्थानला पाठविण्यात आले.