वाचनालये उघडण्यास चालढकलमुळे निराशा

गिरीश कुलकर्णी 
Thursday, 16 July 2020

​सांगली : टाळेबंदीमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता चित्रपटगृहे, मॉलसह करमणुकीच्या ठिकाणांवर बंदी आली. तंबाखू, मावा, मद्यप्रेमी टाळेबंदीदरम्यान हतबल झाले.

सांगली : टाळेबंदीमुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता चित्रपटगृहे, मॉलसह करमणुकीच्या ठिकाणांवर बंदी आली. तंबाखू, मावा, मद्यप्रेमी टाळेबंदीदरम्यान हतबल झाले. मात्र दबाव व मागण्या वाढताच दारु दुकाने काही अटींवर सुरु करण्यास मान्यता मिळाली. मात्र अभिजनांसाठी अत्यावश्‍यक वाचनालयांना चार महिन्यांपासून लागलेले टाळे अजूही कायम आहे. एकीकडे चैनीच्या वस्तू, पेय पानासाठी शासन परवानगी देते. तर दुसरीकडे टाळेबंदीदरम्यान वाचन संस्कृतीला "अच्छे दिन' येत असताना ग्रंथालये, वाचनालये उघडण्यास चालढकलचे धोरण अवलंबल्याने निराशा आहे. 

चार महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या भितीने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे आदेश जारी झाले. चित्रपटगृहे, मॉल, बगीचा, जिम, बाजारपेठांसह मंदिरांनाही टाळे लागले. कडकडीत लॉकडाउनमुळे 24 मार्चपासून एप्रिल, मे महिन्यात पूर्णपणे व्यवहार थांबलेत. प्रशासनाच्या आवाहनामुळे आबालवृध्दांसह घरीच थांबून असल्याने वाचनासाठी वेळच वेळ होता. टीव्ही, मोबाईलमध्ये रममान होण्यासाठीही मर्यादा होत्या. अनेकांनी घरी वाचन सुरु केले. वाचनालये बंद असल्याने पुस्तके उपलब्ध होत नव्हती. 
मद्यालये व पानटपऱ्यांबाबत शासनाने लवचिक धोरण ठेवत मागणीनुसार ती खुली केली. मात्र बंद वाचनालये सुरु करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. बुद्धीवादी वर्ग, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठांनी मागणी करुनही शासन चालढकल करीत असल्याने नाराजी आहे. 

सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर करुन वाचकांना किमान पुस्तकांची देवघेव करण्यासाठी परवानगी मिळण्याची गरज आहे. वाचनालयात बसून वाचन करणे अशक्‍य आहे. लॉकडाउनमध्ये वाचनासाठी लोकांना वेळ होता. चळवळीला बळ मिळाले असते. ती संधी गमावली. बाजारपेठा, दुकाने, लग्नासाठी परवानगी आहे. वाचनालये सुरु करुन वाचनसेवेची संधी उपलब्ध करुन द्यावी. 
- चि. कृ. जोग, भिलवडी 

कोरोनामुळे राज्यातील वाचनालये तीन साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. जिल्ह्यात 377 ग्रंथालये असून अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावेच बंद आहेत. वाचनालये बंद ठेवली आहेत. संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरीच थांबण्याच्या सूचना असल्याने काही दिवस त्यांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे. शासन आदेश आल्यानंतर ग्रंथालये, वाचनालयांशी संपर्क साधून सूचना देऊ. 

- आ. मु. गलांडे, प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disappointment due to delays in opening libraries