esakal | गणेशोत्सवातही भाजप प्रवेशाची धूम ; उदयनराजेंसाठी कार्यकर्ते आग्रही
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवातही भाजप प्रवेशाची धूम ; उदयनराजेंसाठी कार्यकर्ते आग्रही

रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या भाजपच्या मेगाभरतीच्या लाटेतून त्यांचे नाव मागे पडले आहे. 

गणेशोत्सवातही भाजप प्रवेशाची धूम ; उदयनराजेंसाठी कार्यकर्ते आग्रही

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : ऐन गणेशोत्सवात जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप प्रवेशाचे वारे अद्याप निवळलेले नाही. आता खासदार उदयनराजे भोसलेंच्या भाजप प्रवेशासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही झालेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रवेशाची चर्चा मागे पडली आहे. सध्या विघ्नहर्त्या गणेशाचे जिल्ह्यात आगमन झाले असून आता आगामी दहा दिवस सर्वजण गणेशोत्सवात व्यस्त राहतील. पण, राजकीय नेते मात्र, भाजप प्रवेशामुळे चर्चेत राहणार आहेत. 
विधानसभा निवडणुकीसाठी "भाजप चलो...'चा नारा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी दिला आहे. त्यानुसार दिग्गज नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचा फटका कॉंग्रेस व राष्ट्रवादीला बसला आहे. साताऱ्याचे माजी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला खिंडार पडले. तर त्यापूर्वीच कॉंग्रेसचे मदन भोसले आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपमध्ये गेले. गणेशोत्सवापूर्वीच या दिग्गज नेत्यांचे प्रवेश झाले. आता गणेशोत्सवात कोण-कोण भाजपचा झेंडा हाती घेणार, याची उत्सुकता आहे. आजपर्यंत यशवंतराव चव्हाण यांचे बेरजेचे राजकारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. तेच धोरण आता भाजपच्या नेत्यांनी जिल्ह्यात सुरू केले आहे. त्यासाठी महसूलमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टाकलेल्या गळाला आतापर्यंत मोठे मासे लागलेत. आणखी काही मंडळीही भाजपमध्ये जाण्याच्या तयारी आहेत. सध्या तरी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांना काल (रविवारी) एकत्र चर्चा करून उदयनराजेंनी भाजपमध्येच जावे अशी भूमिका घेतली. ही भूमिका त्यांनी उदयनराजेंसमोर मांडली. पण, उदयनराजेंपुढे विधानसभेसोबत लोकसभेची पोटनिवडणूक होणे महत्त्वाचे आहे. स्वतंत्र निवडणूक झाल्यास अडचणीचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य घसरले आहे. आता भाजपमधून निवडणूक लढताना मताधिक्‍य राखणे, ही महत्त्वाची बाब आहे. कारण, राष्ट्रवादीचे आमदार त्यांना मदत करणार नाहीत. असे असले तरीही उदयनराजेंनी भाजप प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे. त्यातून त्यांना पक्ष बदलायचा आहे, हे निश्‍चित होत आहे. कार्यकर्ते व समर्थकांचा सल्ला घेऊन उदयनराजे हे गणेशोत्सवात भाजपत प्रवेश करतील, हे निश्‍चित असले तरी अद्यापपर्यंत त्यांनी तारीख निश्‍चित केलेली नाही. 
आता गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन झाले आहे. आता आगामी दहा दिवस सर्वजण गणेशोत्सवात व्यस्त राहतील. पण, राजकीय नेते मात्र, भाजप प्रवेशाच्या चर्चेत राहणार आहेत. 

रामराजे नाईक-निंबाळकरांचे नाव मागे 
रामराजे हे भाजपमध्ये जाणार, याची सर्वाधिक चर्चा झाली. त्यासाठी तीन मतदारसंघांची मागणीही भाजपकडे केली. पण, त्यांच्या आधी माणचे माजी आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये गेले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा रामराजेंच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे. त्यामुळे रामराजेंच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या भाजपच्या मेगाभरतीच्या लाटेतून त्यांचे नाव मागे पडले आहे. 

loading image
go to top