अन तीन महिने कुलुपबंद फाईलींचा झाला तीन दिवसांत निपटारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

अर्थ विभागाकडे कुलूपबंद असलेली कृषी विभागाकडील अनुदान वाटपाची फाईल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या झाडाझडतीने तीन दिवसात मार्गी लागली.

एरंडोली : अर्थ विभागाकडे कुलूपबंद असलेली कृषी विभागाकडील अनुदान वाटपाची फाईल जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांच्या झाडाझडतीने तीन दिवसात मार्गी लागली. ही तीन महिने प्रलंबित होती.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यंत्रे, अवजारांचे वाटप करण्यात येते. पूर्वी ही खरेदी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत असे. त्यावेळी यंत्रे, अवजाराच्या दर व दर्जाबाबत बराच वादंग निर्माण होत असे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ही खरेदी न करता लाभार्थ्यांनाच खरेदी करण्यास सांगितले. त्याचा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे अनुदानासाठी पाठवला जाऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दर्जेदार साहित्याची खरेदी केली जात आहे. 

यंदा जिल्हा परिषदेमार्फत चापकटर, ट्रॅक्‍टर, पॉवर ट्रिलर, रोटावेटर, इलेक्‍ट्रिक मोटार खेरदी केल्यानंतर लाभार्थ्यांनी यंत्र व अवजारांसोबतची छायाचित्रे घेऊन संबंधित प्रस्ताव ऑक्‍टोबरअखेर सादर करावेत, असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून चाप कटर (330), ट्रॅक्‍टर (91), पॉवर ट्रिलर (67), रोटावेटर व इलेक्‍ट्रिक मोटार (188) यांचे प्रस्ताव ऑक्‍टोबरअखेर जिल्हा परिषदेकडे दाखल करण्यात आले. त्यावर कृषी विभागाने छाननी करून अनुदान वाटपासाठी अर्थ विभागाकडे फायल पाठवल्या. तीन महिन्यांपासून अर्थ विभागाकडे ह्या फायली अनुदान वाटपासाठी अडवून ठेवल्या होत्या.

अनुदानाबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेला हेलपाटे मारले. आज, उद्या करीत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना झुलवत ठेवले. हेलपाटे मारून वैतागलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्यांच्या कानावर हा प्रकार घातला. कृषी विभागाच्या बैठकीत चर्चा झाली. या फायली अर्थ विभागाकडून अडवण्यात आल्याचे समजताच उपाध्यक्ष श्री. डोंगरे यांनी अर्थ विभागाची झाडाझडती घेतली.

अनुदान तत्काळ वितरीत करण्यास सांगितले. झाडाझडतीने पळता भुई थोडी झालेल्या अधिकाऱ्यांनी तीन महिने थकवलेल्या फाइल तीन दिवसात 1 कोटी 70 लाख 32 हजार 210 रूपयांचे अनुदान वितरीत करून मार्गी लावल्या. उपाध्यक्ष श्री. डोंगरे यांच्या कामाच्या धड्याक्‍याचे शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution of funds file cleared in three days after orders of ZP VC Shivaji Dongre.